

पेण : प्रकाश माळी
महामुंबई सेझ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पेण, पनवेल आणि उरण परिसरातील ४५ गावांमधील शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमीनहक्कांच्या प्रश्नांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सेझबाधित शेतकरी हक्क संघर्ष समिती, रायगड यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २४ तासांचे लाक्षणिक ‘जवाब दो’ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
समितीच्या वतीने पेणचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात महामुंबई सेझबाधित ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी सेझमुक्त करणे, सातबारा उताऱ्यावरील सेझसंबंधित नोंदींची कायदेशीर फेरतपासणी करून मूळ भूमिपुत्र शेतकऱ्यांना हक्क प्रदान करणे, तसेच प्रलंबित जमीनहक्कांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही समितीने विविध निवेदने सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, संबंधित निवेदनांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष कार्यवाही आणि निर्णय प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनातील सक्षम व निर्णयक्षम अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या सर्व निवेदनांवर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आंदोलनकर्त्यांसमोर सादर करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच शासन आदेशांची अंमलबजावणी, ४५ गावांतील महसुली नोंदींची सद्यस्थिती, भूमापन प्रक्रिया आणि जमिनीवरील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अंदोलन दरम्यान आमदार रवीशेठ पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व येत्या अधिवेशनात हा विषय घेणार आहोत आसे आश्वासन दिले. तसेच उबाठा रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद भोईर यांनी अंदोलन कर्त्यांना पाठींबा दर्शवून आम्ही तुमच्या सोबत शेवट पर्यंत राहाणार आसल्याचे सागितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां नंदा म्हात्रे, राजन झेमसे, अभिमन्यू म्हात्रे, जितू ठाकूर, उबाठा पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अजित पाटील, प्रितेश माळी, संदीप पाटील ,दिलीप म्हात्रे, तुषार पाटील, सचीन पाटील, मंगेश म्हात्रे राजा म्हात्रे तसेच सेझ बाधित शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दिलीप म्हात्रे, आदी उपस्थित होते.
महामुंबई सेझच्या नावाखाली वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या जमीनहक्कांच्या प्रश्नांना आता तरी न्याय मिळणार का, याकडे ४५ गावांतील शेतकरी आणि भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे.
केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष निर्णय द्या!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने किंवा तोंडी उत्तरे न देता प्रत्येक मागणीवर लेखी स्पष्टीकरण आणि अधिकृत कार्यवाही अहवाल द्यावा, अशी समितीची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता असून रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला आहे.
सेझ बाधित आंदोलक शेतकरी प्रकल्पासाठी संपादित जमीनीवर १५ वर्षांत प्रकल्प न झाल्याने व सेझ रद्द झाल्याने सर्व शेतकरी प्रकल्पातून मुक्त झाल्याची घोषणा १८फेब्रुवारी २०११ रोजी सरकारने केली आहे. सदर जमीन मूळ शेतकर्यांच्या नावे पूर्ववत करण्यात यावी व संपादित जमीन सरकारजमा करण्याच्या सकारच्या अन्यायकारक निर्णयाला विरोध करत सरकारने शेतकरी संघटनेने दिलेल्या निर्णयाचे उत्तर शासनाने द्यावे, ह्यासाठी हे २४ तासांचे जवाब दो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात रास्तारोको आंदोलन करणार आहोत.
नंदा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या