

संदेश उतेकर
सुधागड शहर: किल्ले सरसगडच्या कुशीत दडलेल्या आणि एका अद्वितीय कालखंडाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक पाऊलखुणा शोधण्यात दुर्गप्रेमींना मोठे यश आले आहे. विख्यात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पूर्वी वाचन केलेला, परंतु काळाच्या ओघात विस्मरणात गेलेला ‘श्री दातार यांच्या विहिरीवरील ऐतिहासिक शिलालेख’ आणि ती विहीर शोधून काढण्यात ‘दुर्गवेध परिवार’ संस्थेला यश आले आहे. सलग 3 महिन्यांच्या अथक आणि खडतर शोधमोहिमेनंतर या ऐतिहासिक वारशाला अखेर मोकळा श्वास मिळाला आहे.
3 महिन्यांची अथक शोधमोहीम
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या संशोधन निबंधात या ऐतिहासिक विहिरीचा आणि शिलालेखाचा स्पष्ट उल्लेख होता, मात्र तिचे अचूक स्थान आजवर इतिहास अभ्यासक किंवा सह्याद्री भटक्यांच्या निदर्शनास आले नव्हते. दुर्गवेध परिवाराने सरसगडचा इतिहास पुन्हा जिवंत करण्याच्या हेतूने गेले 3 महिने विशेष शोधमोहीम राबवली. शिलालेखातील स्थानाचा संदर्भ आणि स्थानिक नागरिकांची मदत यांच्या जोरावर अखेर ही विहीर शोधून काढण्यात आली.
श्रमदानातून परिसर चकाकला -
तीव्र जंगल, झाडी-झुडपे आणि माणसांची ये-जा नसल्यामुळे हा संपूर्ण परिसर झाकोळला गेला होता. दुर्गवेध परिवाराच्या सदस्यांनी विशेष श्रमदान करून विहिरीच्या परिसरातील झाडी आणि अडगळ दूर केली. त्यामुळे ही विहीर आता दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. परंतु, दुर्दैवाने ज्या भागावर ऐतिहासिक शिलालेख कोरला होता, तो भाग विहिरीच्या आत कोसळल्यामुळे हा शिलालेख सध्या प्रत्यक्ष पाहता आलेला नाही.
विविध संस्था,स्थानिकांचे सहकार्य
या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण मोहिमेत दुर्गवेध परिवाराला ‘शिवसेवक प्रतिष्ठान’ आणि ‘स्वराज्याचे शिलेदार’ या संस्थांच्या मावळ्यांनी मोलाची साथ दिली. याचसोबत पालीतील स्थानिक रहिवाशी रवी लिमये, सूरज शेळके, वैभव आपटे, अभिजीत चांदोरकर, राकेश काटकर, उमेश मढवी यांचे विशेष सहकार्य लाभले. या शोधकार्यासाठी संस्थेला इतिहास अभ्यासक केतन पुरी, संदीप परब आणि सचिन जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
17 समाध्यांचा परिसर चकाकला
श्री थाडेश्वर गोसावी मठातील 17 समाध्यांचा परिसर चकाकला! या मोहिमेदरम्यान केवळ विहीरच नव्हे, तर विहिरीच्या पश्चिमेस असलेल्या ‘श्री थाडेश्वर गोसावी मठ’ परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. येथील एकूण 17 समाध्यांपैकी 14 ऐतिहासिक समाध्यांचा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे. दुर्गवेध संस्थेकडून आता या समाध्यांची अधिकृत नोंद व माहिती संकलित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.
या ऐतिहासिक वास्तू उजेडात आल्यामुळे किल्ले सरसगडच्या इतिहासाला अधिक झळाळी मिळाली आहे. संस्थेकडून सध्या आणखी दोन महत्त्वाच्या शिलालेखांचे, तसेच इतर ऐतिहासिक दस्तावैजांचे वाचन सुरू आहे, जे लवकरच इतिहासप्रेमींच्या समोर आणले जाईल.
- नितेश देसाई, संस्थापक, दुर्गवेध परिवार