

Mumbai Goa Highway Kashedi Ghat Landslide
पोलादपूर: मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावर ४ ठिकाणी मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला. ही घटना सोमवारी रात्री मुसळधार पावसात घडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
रत्नागिरी जिल्ह्यात व दक्षिण रायगडचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर तालुक्यात दिवसभर मुसळधार पावसाने दमदार सलामी दिली. पोलादपूर तालुक्यात 2 ठिकाणी घराचे नुकसान झाले. कशेडी घाटातील धामणदेवी, भोगाव येथून बोगदा मार्गे नवीन महामार्ग सुरू झाल्याने रायगड, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाकडून जुन्या महामार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
कशेडी घाटातील बोगदा मार्गे नवीन महामार्गावर काही अनुचित प्रकार घडल्यास जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवावी लागणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित प्रशासन यांनी जुन्या महामार्गाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि अडचणी वाढणार आहेत. जुना महामार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत करणे गरजेचे बनले आहे.
जुन्या महामार्गावरील धामणदेवी गावापासून कशेडी बंगला पर्यंत रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्पेट टाकून सुस्थितीत केला आहे. परंतु, भोगाव हद्दीतील खचलेल्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. 3 ते 4 फूट खोल खचलेला रस्ता अद्यापही जैसे थे अवस्थेत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा महत्वपूर्ण मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन व जुन्या महामार्गा वरील घाट परिसरात जाणीवपूर्वक लक्ष देणे तितकेच गरजेचे बनले आहे. अन्यथा बोगद्यामार्गे पावसाळ्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास जुना महामार्ग वाहतुकीसाठी सोयीचा ठरणार आहे. यासाठी संबंधित प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.