

आनंद सकपाळ
नेरळ: रायगड जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींचे सुरुवाती सुरु असलेले योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्याने संबंधित लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. त्याचबरोबर आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत असली तरी ही प्रक्रिया यशस्वी होईल का याबाबतही महिलांमध्ये धाकधुक आहे. ई-केवायसीत त्रुटी राहिल्यास अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने आपल्याला लाडकी बहिण योजनेचा हप्ता सुरु राहणार की बंद होणार असा प्रश्न महिलांना सतावत आहे.
कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. कर्जत शहरासह तालुक्यातील विविध भागांत याच विषयावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पात्र असूनही लाभ न मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता, नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा होणारे योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी आवश्यक असलेली ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात आजतागायत रक्कम जमा झालेली नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर नोव्हेंबरचा हप्ता पुढील चार दिवसांत जमा होईल अशा प्रकारच्या आश्वासनांची चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे सलग पाच महिने उलटून एप्रिल महिना सुरू झाला, तरीही संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही.
त्यामुळे या आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने लाडक्या बहीणींमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर तालुक्यातील महिलांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत असून, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पात्र असूनही लाभ का मिळत नाही? असा थेट सवाल अनेक महिलांकडून विचारला जात आहे.
लाभा पासून वंचित असलेल्या महिलांकडून प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये बंद पडलेले हप्ते तात्काळ सुरू करावेत, प्रलंबित रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी, योजनेतील तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडचणी दूर कराव्यात. अशा मागण्यांचा समावेश आहे.
63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी पूर्ण
महाराष्ट्र शासनाची ‘लाडकी बहीण’ योजना सन 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे.
मला मागील दोन महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात आलेले नाहीत. तर तालुक्यातील काही महिलांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नोव्हेंबर महिन्यापासून खात्यावर आलेले नाहीत.
- दीपाली घोडके, गुंडगे-कर्जत