Konkan Unseasonal Rain | कोकणात अवकाळीचा इशारा; रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

उत्तर कोकणात हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज
Unseasonal Rain
Unseasonal Rain Pudhari
Published on
Updated on

Raigad Ratnagiri Sindhudurg weather warning

रायगड : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मुंबई प्रादेशिक केंद्राकडून प्राप्त अधिकृत अहवालानुसार, पुढील पाच दिवस म्हणजेच २० मे ते २४ मे २०२६ या कालावधीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये हवामानात मोठा बदल होणार आहे. दक्षिण व मध्य कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात मात्र हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना व सोसाट्याचा वारा

दक्षिण कोकणाचा विचार करता, रायगड जिल्ह्यात आज, २० मे रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर २१ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस या ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळतील, तर २४ मे रोजी हवामान पूर्णपणे कोरडे होईल. रत्नागिरी जिल्ह्यातही आज आणि २२ ते २४ मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून, २१ मे रोजी पावसाचा जोर काहीसा वाढून तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज आणि उद्या (२० व २१ मे) जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला असून, तिथे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्यासोबतच मध्यम पावसाचा अंदाज आहे. २२ ते २४ मे दरम्यान सिंधुदुर्गात हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.

Unseasonal Rain
Raigad Unseasonal Rain : दोन दिवसांच्या अवकाळी पावसाचा फटका

मुंबई आणि ठाण्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता

दुसरीकडे, उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात पुढील पाचही दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज हवामान कोरडे असले, तरी उद्या २१ मे रोजी काही भागात हलका पाऊस किंवा थंडर्सॉवरची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर २२ ते २४ मे या काळात मुंबई-ठाण्यात पुन्हा हवामान कोरडे होईल.

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा विशेष 'अॅग्रोमेट' कृषी सल्ला

या संभाव्य वादळ आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला आहे. पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेली पिके लवकरात लवकर कापून सुरक्षित ठिकाणी साठवावीत. मळणी (थ्रेशिंग) करणे शक्य नसेल, तर काढणी केलेले पीक ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावे आणि साठवलेले धान्य सुरक्षित गोदामात हलवावे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडू नयेत म्हणून फळबागांमधील लहान झाडे आणि भाजीपाल्याला बांबू किंवा काठ्यांचा आधार देणे आवश्यक आहे. तसेच, या काळात पिकांना सिंचन करणे किंवा कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करणे टाळावे आणि पाळीव जनावरांना विजांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित गोठ्यातच ठेवावे.

Unseasonal Rain
Unseasonal rain mango crop damage: अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या आंब्याचा बाजार धुळीस

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी शेतात किंवा खुल्या मैदानात काम करणे टाळावे, तसेच उंच झाडांचा किंवा कच्च्या रचनांचा आश्रय घेऊ नये. विजांचा त्रास टाळण्यासाठी घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्वरित अनप्लग करावीत आणि नदी, विहीर किंवा कोणत्याही जलस्रोतांमध्ये असल्यास नागरिकांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news