

माणगाव : कोकण कन्या एक्स्प्रेस सुरू झाली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथील रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने दक्षिण रायगड मधील सात तालुक्यातील हजारो रेल्वे प्रवाशांना लाभ मिळत नाही. त्यामुळे माणगाव येथील रेल्वे स्थानकावर कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
हजारो प्रवाशांसाठी कोकण कन्या एक्सप्रेस (रेल्वे क्र. 20111) ही केवळ एक रेल्वेगाडी नसून, भावनांना स्पर्श करणारा प्रवास आहे. कोकणच्या लाल मातीतून, हिरव्यागार डोंगररांगांतून, खोल दऱ्या-खोऱ्यांतून आणि समुद्राच्या निळ्याशार किनाऱ्यालगत धावणारी ही गाडी प्रवाशांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करते.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 11:02 वाजता सुटणारी ही गाडी सकाळी 09:45 वाजता मडगावला पोहोचते. अवघ्या 10 तास 45 मिनिटांत पूर्ण होणारा हा प्रवास जरी वेळेत छोटा वाटला, तरी अनुभवाने मात्र अत्यंत समृद्ध असतो. रात्रीच्या शांततेत सुरू झालेला प्रवास सकाळी कोकणच्या निसर्गरम्य दर्शनाने भारावून टाकतो.
स्लीपर क्लासपासून ते 1 एसीपर्यंत विविध श्रेणींमध्ये तिकीट सुविधा उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांपासून ते पर्यटकांपर्यंत प्रत्येकासाठी ही गाडी सोयीची ठरते. कोकण रेल्वेमार्गावरील शेकडो बोगदे, उंच पूल, नद्या, दऱ्या आणि समुद्रकिनाऱ्याचे मोहक दृश्य प्रवाशांना मंत्रमुग्ध करतात. प्रत्येक वळणावर निसर्ग आपली नवी छटा उलगडत राहतो.
दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा उपचारासाठी मुंबई-गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसतो. विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला प्रवाशांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. जवळच्या स्थानकांवर उतरून अतिरिक्त प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा ताण वाढतो. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांकडून माणगाव येथे कोकण कन्या एक्सप्रेसला थांबा द्यावा, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
माणगावला थांबा मिळाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. कोकण सफर अधिक सुंदर पण माणगावला न्याय कधी? कोकण कन्या एक्सप्रेस प्रवाशांच्या मनात आनंद आणि समाधान निर्माण करत असताना, माणगावसारख्या महत्त्वाच्या ठिकाणासाठी ती अजूनही एक अपूर्ण कथा ठरत आहे.
माणगावचा प्रश्न प्रवाहातून वंचित का?
इतक्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय गाडीचा माणगाव येथे थांबा नसणे, ही स्थानिकांसाठी मोठी खंत बनली आहे. माणगाव हे कोकणातील एक प्रमुख शैक्षणिक, व्यापारी आणि सामाजिक केंद्र असूनही या गाडीने येथे थांबा न घेणे, ही एक प्रकारची उपेक्षा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रवासातील महत्त्वाचे टप्पे
दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी ते मडगाव या प्रत्येक स्थानकातून कोकणच्या जीवनशैलीची, संस्कृतीची आणि सौंदर्याची झलक पाहायला मिळते.यामुळे या रेल्वेला प्रवाशांची जास्त पसंती असते.