

Raigad ZP President Selection
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी १२ मार्च रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचा कार्यक्रम रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता अलिबाग येथील नियोजन भवनाच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीतच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना २० मार्चपूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेची पहिली बैठक १२ मार्च रोजी घेण्यात येत असून त्याच दिवशी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठीही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ११ मार्च रोजी संबंधित पंचायत समित्यांमध्ये विशेष सभा घेऊन सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे.
यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या नेतृत्वाची निवड निश्चित होणार आहे.