

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध कोंडविली बीच येथे शुक्रवारी पुण्यातून आलेल्या पर्यटकांची एक कार समुद्र-किनाऱ्यावरील वाळूमध्ये अडकून मोठा बाका प्रसंग निर्माण झाल्याने धावपळ उडाल्याची घटना घडली. प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत कोणतेही वाहन उतरवण्यास स्पष्ट बंदी घातलेली असतानाही काही अति उत्साही पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पुणे येथून आलेल्या पर्यटकांनी कार थेट समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत नेली. भरतीचे पाणी वाढत असतानाही वाहनाजवळ उभे राहून सेल्फी व छायाचित्रण करण्यात ते गुंग होते.
मात्र समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याचा अंदाज त्यांना आला नाही. काही वेळातच पाणी कारपर्यंत पोहोचल्याने पर्यटकांची एकच धावाधाव उडाली. सु-रुवातीला गाडी बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र समुद्राला मोठी भरती असल्याने आणि वाळू खोलवर सैल झाल्याने कार अधिकाधिक रुतत गेली. वाहनाचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग वाळूमध्ये गाडला गेला होता.
अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने अथक प्रयत्नांनंतर ही कार वाळूतून बाहेर काढण्यात यश आले. तथापि, समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. इंजिनसह वाहनाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून कारची यांत्रिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेऊन 'मज्जा' करण्याच्या प्रयत्नात अशा घटना वारंवार घडत असतात. भरती-ओहोटीच अचूक अंदाज नसताना समु-द्रकिनाऱ्यावर वाहन नेणे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे तर जीविता-साठीही धोकादायक ठरू शकते.
या घटनेनंतर प्रशासनाकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. समु-द्रकिनाऱ्यांवर वाहनांना कडक बंदी, दंडात्मक कारवाई, सूचना फलक आणि कठोर नियम करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.