

दोडामार्ग : इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समाविष्ट कोलझर गावाच्या निसर्गावरच घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित ‘दिल्ली लॉबी’ विरोधात संपूर्ण गाव पेटून उठले आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पूर्वजांनी जपलेल्या जमिनी वाचवण्यासाठी कोलझरवासीयांनी थेट संघर्षाचा निर्धार केला असून जमीन विकायची नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना कायदेशीर व आंदोलनात्मक मार्गाने धडा शिकवायचाच, असा ठाम संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे या लढ्याचे नेतृत्व मोठ्या संख्येने तरुणांनी हातात घेतले आहे.
वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार केंद्राने अधिसूचना काढून कोलझर गाव इकोसेन्सिटीव्ह म्हणून जाहीर केले आहे. येथे पर्यावरणाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. याशिवाय येथे 2018 पासून वृक्षतोड बंदी आदेश लागू आहे. असे असूनही गेल्या आठवड्यात काही ‘दिल्ली लॉबी’शी संबंधित लोकांनी स्थानिक जमीन मालकांना तसेच ग्रामस्थांना अंधारात
ठेवून मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ख्रिश्चनवाडीपासून पुढे घनदाट जंगलापर्यत अवैधरित्या खनिजयुक्त मातीचे उत्खनन केले आहे. ख्रिश्चनवाडीपासून पलिकडच्या गावातील शिरवल, न्हयखोलपर्यंत सुमारे 4 किलोमीटर लांबीचे आणि सुमारे 12 फूट रुंदीचे रस्तासदृश्य उत्खनन केले आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या गावाने यापूर्वी खनिज उत्खननाचे वारे असतानाही आपल्या जमिनी दिल्या नव्हत्या. थेट झालेल्या अतिक्रमणाविरोधात लढा पुकारण्यासाठी गाव एकवटला.