

Bhonga free campaign Maharashtra
पनवेल: महाराष्ट्र भोंगा मुक्त मोहिमेला गती देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.२१) पनवेलचा दौरा केला. यावेळी त्यांनी खारघर, कळंबोली आणि तळोजा पोलीस ठाण्यांना भेट देऊन शहरातील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी पोलिसांकडे केली. सोमय्या यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिसांनी येत्या आठ दिवसांत कारवाई करून भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.
"धर्माच्या नावाखाली कोण माफिया दादागिरी करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, अशा शब्दांत सोमय्या यांनी दम भरला . कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे. अनधिकृत भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण वाढत असून नागरिकांच्या नाराजीचा प्रश्न उभा राहत आहे. या संदर्भात प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.
या दौऱ्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही त्यांच्या सोबत होते. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "मुंबईत अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. आता पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रातून भोंगे काढण्यासाठी आम्ही मोहिमेला सुरुवात करत आहोत. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसत आहे. भोंगा मुक्त मोहिमेच्या पुढाकारामुळे प्रशासनावर कारवाईची जबाबदारी येऊन पडली आहे आणि पुढील काही दिवसांत याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.