

पनवेल शहर: विदेशात शिपिंग कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अनेक तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खारघर येथील अव्हॉन नेव्हिगॉर्झ मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १ कोटी ७३ लाख ८१ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नोकरीच्या आमिषाने तरुणांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याने बेरोजगार तरुण हवालदिल झाले असून त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर-७ येथील कार्यालयातून शिपिंग कंपनीच्या नावाखाली तरुणांना मलेशिया व इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते.
नोकरीसाठी सर्व्हिस चार्ज, व्हिसा प्रक्रिया, तिकीट आणि इतर खर्चाच्या नावाखाली उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांनी कंपनीच्या प्रतिनिधींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले.
मात्र पैसे भरल्यानंतरही नोकरी, व्हिसा किंवा प्रवासाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फसवणूक झाल्याचा संशय असलेले अनेक तरुण गेल्या दोन दिवसांपासून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र गुन्हा नोंदविण्याबाबत विलंब होत असल्याची माहिती समोर आली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पथकाला खारघर पोलीस ठाण्यात पाठविले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक झालेल्या तरुणांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारदार जेव्हा शिपिंग कंपनीच्या खारघर येथील कार्यालयात पोहोचले, तेव्हा कार्यालय बंद असल्याचे समोर आले. या प्रकरणात कंपनीचे कथित मालक, व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी यांनी संगनमताने नोकरीच्या आमिषाने तरुणांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणुकीची एकूण रक्कम १ कोटी ७३ लाख ८१ हजार ४०० रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नोकरीच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत पडताळणी करण्याचे आवाहन यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले आहे. याबाबत ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना एक पत्र दिले आहे.
संबंधित बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या शिपिंग कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बनावट संपादित दस्तऐवज फॉर्म नंबर एकचा गैरवापर करून देशभरातील बेरोजगार तरुणांचे आर्थिक शोषण करणाऱ्या शिपिंग कंपनी विरुद्ध त्यांच्या भरती प्रक्रियेची संपूर्ण सखोल चौकशी करावी, कथित बनावट फॉर्म नंबर एकची सखोल किंवा फॉरेन्सिक तपासणी करावी, बेरोजगार नागरिकांकडून घेतलेल्या आर्थिक फसवणुकीचे पडताळणी करून चौकशी करावी तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शिपिंग कंपनीत नोकरी मिळाली या आमिषाने पनवेल येथे आलेल्या व फसगत झालेल्या नागरिकांना शासन स्तरावर योग्य ती मदत देऊन त्यांच्या जीविताचे संरक्षण करून पीडित तरुणांना दिलासा द्यावा.
- संजय पवार, अध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स