

कांदिवली: कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील कॅन्टीन स्टॉलवर एका व्यक्तीने समोसा पाव घेतला असता त्यात चक्क दीड इंची लोखंडी खिळा सापडल्याची घटना घडली. समोशात खिळा कसा काय आला अशी विचारणा केली असता कॅन्टींनवाल्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत समोसे आम्ही बनवत नाही तर बाहेरून बनवलेले आणतो असे सांगितले.
यावर त्या व्यक्तीने कॅन्टीन स्टॉलवाल्याला रेल्वे मुख्य कार्यालयात नेऊन त्याची तक्रार केली. यावेळी नागरिकांच्या खाद्य वस्तूंमध्ये अशा प्रकारे भेसळ व खिळे सापडत असतील तर खाद्य सुरक्षेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले.
कॅन्टींनमध्ये समोसे वडे बनवून विकण्याकरिता माफत दरात रेल्वे कॅन्टीन भाडेतत्त्वावर दिले जाते. असे असताना समोसे, वडे बाहेरून का मागवले जातात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि खाद्याची हेळसांड करणाऱ्या कॅन्टीन स्टॉलवाल्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.