

पनवेल : खारघर परिसरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास खारघर पोलिसांनी अटक केली आहे. अजयकुमार जनझोरड (29) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका करून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
अजयकुमार हा खारघरमधील पेठ गावात राहण्यास होता. गेल्या काही महिन्यापूर्वी आरोपी अजयकुमार याने पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्याने संधी साधून पीडित मुलीला पळवून नेत तीला कळंबोली लेबर कॅम्प मधील रूमवर नेऊन ठेवले होते. पीडित मुलीने तिची आई काम करत असलेल्या मॅडमच्या घरी जाते असे लहान बहिणीला सांगून घरातून निघून गेली होती.
मात्र, सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या घरच्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीनुसार खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. या तपासादरम्यान पोलिसांनीपरिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पीडित मुलगी एका तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर खारघर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीचा नंबर मिळवून त्याच्या मालकाचा शोध घेतला असता, ही दुचाकी अजयकुमार याची असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन खारघरमधील पेठ गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल करत पीडित मुलीला कळंबोली येथील लेबर कॅम्पमधील घरामध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला कळंबोली येथून ताब्यात घेऊन तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, अजयकुमार याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.