

रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या थळ समुद्रातील शिवकालीन ऐतिहासीक खांदेरी किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आला असून आता खांदेरी किल्ला राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व संवर्धनाच्या कामाकरिता 7 कोटी 92 लाख 1 हजार 718 रुपयांचा निधीला राज्य शासनाने गुरुवारीमान्यता दिली आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याकरिताच्या नामांकन यादीत देखील खांदेरी किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे.
खांदेरी किल्ल्याचा समावेश हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याकरिताच्या नामांकन यादीत करण्यात आला आहे. खांदेरी किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाची लवकरच युनेस्कोच्या तज्ञ पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे. परिणामी आता रायगड जिल्ह्यातील सागरी किल्ला या श्रेणीतील खांदेरी किल्ला नावारुपास येऊन एक ऐतिहासीक पर्यटनस्थळ म्हणून देखील विकसीत होणार आहे.
सन 2023-24 या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. त्यानुषंगाने मुंबईतील संक्रमण डिझाईन स्टुडिओ या नामिकासूचीतील वास्तुविशारदांनी खांदेरी किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व संवर्धनाच्या कामासाठी 7 कोटी 92 लाख 01 हजार 718 इतक्या रकमेचे सविस्तर अंदाजपत्रक राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे शासन मान्यते साठी सादर केले होते. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
दरम्यान पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालनालयाचे संचालक यांना राज्य शासनाने याकामी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. हे काम पुरातत्वीय निकषानुसार आणि मानकानुसार विहीत कालावधीत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक आणि संबंधित संवर्धन वास्तुविशारद यांची राहणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.
संपूर्ण किल्ला स्वच्छता
संवर्धन व घनकचरा व्यवस्थापन
किल्ला परिसरातील गवत व मातीचा बुरशीचा थर काढून टाकणे
किल्ल्याची दुरुस्ती व तटबंदीची दर्ज (भेगा) भरणे
किल्ल्यावर पदपथाची निर्मिती करणे
मुंबई आणि उत्तरेकडील बंदरांवर इंग्रजांच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटाची निवड केली. जुन्या नोंदीनुसार, खांदेरी किल्ल्याचा उल्लेख कुन्द्रा, चुन्द्री आणि केन्री असा उल्लेख केला जातो. हे लहानसे बेट मुंबई बंदराच्या मुखाशी मुंबईच्या दक्षिणेस 11 मैल आणि अलिबागच्या वायव्येस सहा मैल अंतरावर आहे. इंग्रज, पोर्तुगिज व सिद्दी यांचा प्रचंड विरोध झुगारुन छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. 1672 मध्ये हा किल्ला बांधला.