

खोपोली ः प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने निनादणान्या या शाळा आज ओस पडताना दिसत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे मातृभाषेतील शिक्षणाचा पाया डळमळीत होत चालला असून यावर वेळीच उपाययोजना न राबल्यास मराठी शाळेचे अस्तिव धोक्यात येईल अशा परिस्थितीकडे वाटचाल असल्याचे चित्र तालुक्यातील जि. प. शाळांवर आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील पालकांनो आपल्या पाल्याला इंग्रजी येणे म्हणजे उज्वल भविष्य हा समज खोलवर रुजला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देत आहेत. शेती, मजुरी करणारे पालकही कर्ज काढून फी भरताना दिसत आहेत. रा.जि.प.च्या मराठी शाळेत मुलांना घालणे कमीपणाचे वाटू लागल्याचे वास्तव समोर येत आहे. याचा थेट परिणाम गावोगावच्या रा.जि.प.च्या मराठी शाळांवर आला आहे.
खालापूर तालुक्यामधील दुर्गम भागातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. ज्या वर्गामध्ये पूर्वी 40 हे 50 विद्यार्थी असायचे, तिथे आता 15 ते 20 विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तुकड्या बंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. उन्हाळी सुट्टीत घरोघरी जाऊन पालकांना समजावून सांगावे लागते.
प्रवेश मोहिमा राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक मराठी शाळांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत. डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग, क्रीडा सुविधा आणि अनुभवी शिक्षक उपलब्ध आहेत. तर काही ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमही सुरु करण्यात आले आहे. तरीही पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडेच आहे.
ग्रामीण भागात इंग्रजी शाळांच्या बसेस थेट घरापर्यंत पोहोचतात. मुलं टाय बेल्ट घालून बसमध्ये बसतात, हे दृश्य पालकांना आकर्षित करते. मात्र, या चमकघमक पलीकडे शिक्षणाचा दर्जा आणि मुलांचे मूलभूत आकलन याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
शिक्षण तज्ञ यांच्या मते, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांची बौद्धिक क्षमता अधिक चांगली विकसित होते. इंग्रजीच्या आंधळ्या स्पर्धेत ही बाब दुर्लक्षित होत आहे. ही केवळ शाळांची समस्या नाही. ही खालापूरातील सांस्कृतिक ओळखीशी निगडित बाब आहे. मराठी भाषा, संस्कार आणि स्थानिक परंपरा यांचे जतन मराठी शाळांमधूनच होते, जर मराठी शाळा बंद पडल्या, तर पुढील पिढी आपल्या मुळांपासून दूर जाईल.
पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन उपाय शोधणे गरजेचे आहे. मराठी शाळांबाबतचा न्यूनगंड दूर करणे आवश्यक आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणासोबत मराठी माध्यमाचे महत्व पठवून देणे काळाची गरज आहे. आज निर्णय घेतला नाही, तर उशीर होईल. खालापूरातील मातीत मराठी शाळांचा दिवा कायम ठेवत ठेवायचा असेल, तर सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
खालापूरात जि.प. शाळा. 166 वविद्यार्थी संख्या. 6172 व शिक्षकांची संख्या 391 एक आकडी पट शाळा 7 आहेत. यामध्ये पोखरवाडी 7,वडविहीर बौद्धवाडी 8,आसरेवाडी 6,खडई 5,बोरिमाल 6, चिंबोडे 9,गावधन वाडी 4 तर 10 संख्या असणाऱ्या 12 शाळा आहेत तसेच शिक्षकांची रिक्त संख्या 16 आहे.
दीपा परब, गट शिक्षणअधिकारी, खालापूर