Karjat road potholes : गणेशोत्‍सवापूर्वी कर्जतमधील रस्ते खड्डेमुक्त करा

बाप्पाच्या साक्षीने रमेश कदम यांचे आंदोलन; सा.बां.चे खड्डे गणपतीपूर्वी भरण्याचे लेखी आश्वासन
Karjat road potholes
रमेश कदमpudhari photo
Published on
Updated on

नेरळ : आनंद सकपाळ

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील सर्व बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्ते खड्डेमुक्त करावेत, या मागणीसाठी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश शांताराम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवार ९ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत श्रीराम पूल येथे कदम यांनी आंदोलन सुरू केले असून, रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत उपविभागाने कदम यांना ८ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी पत्र देत आपल्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे गणपती उत्सवापूर्वी भरण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती दिल्याचे चित्र आहे.

Karjat road potholes
Coconut price hike : ऐन गणपतीच्या सणामध्ये नारळ वधारणार

लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का? -सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ रस्त्यांवरील खड्डे गणपतीपूर्वी भरण्याचे लेखी आश्वासन दिले असले तरी, या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, हा आता महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कर्जत तालुक्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूककोंडी, अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

केवळ कागदोपत्री आश्वासन न देता गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्ते प्रत्यक्षात सुरक्षित आणि खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी रमेश कदम यांनी केली आहे. "गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी कर्जत तालुक्यातील सर्व बांधकाम विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्ते खड्डेमुक्त करावेत, हीच गणेशभक्तांची अपेक्षा आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी आणि राजिप व एमएसआरडीसी नेही त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी," अशी भूमिका रमेश कदम यांनी व्यक्त केली. दरम्यान, कर्जत श्रीराम पूल येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित विभाग प्रत्यक्ष रस्ते दुरुस्तीला किती वेग देतात आणि गणपतीपूर्वी तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त होतात का, याकडे आता कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

राजिप व एमएसआरडीसीच्या रस्त्यांवरूनही आक्रमक भूमिका दरम्यान, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते दुरुस्त करून प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत रमेश कदम यांनी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या अखत्यारीतील रस्त्यांबाबतही आक्रमक भूमिका घेतली आहे.

रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच एमएसआरडीसी बांधकाम विभागाने रस्त्यांच्या प्रश्नाची साधी दखलही घेतली नसल्याचा, तसेच याबाबत चर्चा करण्यासही पुढाकार घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Karjat road potholes
Varandha Ghat ST bus service : वरंधा घाटातून एसटीबससेवा पूर्ववत करा

खड्डे कायम राहिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गणपती उत्सवापूर्वी संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्ते खड्डेमुक्त न केल्यास गणपती बाप्पाच्या साक्षीने खड्डेमय रस्त्यावर झोपून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे. त्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर उल्हास नदीपात्रात गणपती बाप्पासमोर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानुसार, पावसाळ्यापूर्वी जीएसबीच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले होते. मात्र जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुन्हा खड्डे निर्माण झाले. त्याची दखल घेत पावसाळ्यात वेळोवेळी जीएसबी टाकून रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या कर्जत उपविभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रगतीपथावर असून, गणपती उत्सवापूर्वी खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

१५ रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत उपविभागाने आपल्या अखत्यारीतील १५ रस्त्यांची यादी कदम यांना दिली आहे. त्यामध्ये उक्रूळ-कर्जत-आवळस, आसल-भूतिवली, कळंब-पाषाणे हद्द, बार्णे-साळोख, खांडपे-तिवणे, रा.मा. ५४८ ए ते टाटा रस्ता, सावळे-वांजरवाडी, कोठिंबे पेठ, चिंचवली ते रा.मा. ७६ जोडणारा रस्ता, नालधे-अंजप, नेरळ-काशेळे, कशेळे-खांडस, कोठिंबे- जामरुंग, पोशीर-नांदगाव आणि दहिवली-कुरूंग या रस्त्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news