Karjat Panvel Railway Line-कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

आणखी काही महिन्यांत धावणार लोकल; २९.६ किमीच्या नव्या मार्गामुळे कर्जत-पनवेल प्रवास अवघ्या ४० मिनिटांत, नवी मुंबई, पनवेल, कर्जत परिसराच्या विकासाला मिळणार नवी गती
 Karjat Panvel Railway Line
Karjat Panvel Railway Line
Published on
Updated on

नेरळ : आनंद सकपाळ

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कर्जत-पनवेल दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, आणखी काही महिन्यांत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईकडे प्रवास अधिक जलद, सुरक्षित होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पनवेल-कर्जत लोकलचे स्वप्न आता साकार होण्याच्या उंबर ठ्यावर आले आहे.

 Karjat Panvel Railway Line
Raigad News | पोलादपुरातील दुर्गम शाळांची पं. स. सभापतींकडून अचानक पाहणी; शिक्षक अनुपस्थितीवर संताप, कारवाईचे आदेश

सुमारे २९.६ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पात नढळ, वावर्ले आणि किरवली असे तीन बोगदे असून त्यांची एकूण लांबी सुमारे ३.२ किलोमीटर आहे. त्यापैकी २.६३ किलोमीटर लांबीचा वावर्ले बोगदा हा मुंबई उपनगरी रेल्वे जाळ्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यांच्या उभारणीवर सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या मार्गावरील ४७ पैकी ३५ हून अधिक लहान-मोठ्या पुलांची कामे पूर्ण झाली असून, रेल्वे रुळांसाठी अत्याधुनिक बॅलास्टलेस ट्रॅक (खडीमुक्त रुळ) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बोगद्यांमध्ये प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, स्थिर आणि कमी देखभाल खर्चाची ठरणार आहे. चौक ते कर्जत दरम्यान रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, रेल्वे प्रशासनाने चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आहे. या यशस्वी चाचणीमुळे प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 Karjat Panvel Railway Line
Fishing Boat Surveillance Drones- परराज्यातील मच्छीमार बोटींवर नजर ठेवण्यासाठी ९ ड्रोन तैनात

एम आर व्ही सी च्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ अखेर प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले होते. उर्वरित काम पूर्ण करून आवश्यक सुरक्षा तपासण्या झाल्यानंतर २०२६ च्या पावसाळ्या-नंतर हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावर सुमारे २,७८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत प्रवासासाठी कल्याणबरोबरच पनवेलमार्गे आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी ताण कमी होण्यास मदत होणार असून, पनवेल, नवी मुंबई, उलवे, चौक, नेरळ आणि कर्जत परि-सरातील हजारो प्रवाशांना थेट लोकल सेवेचा लाभ मिळणार आहे.

सध्या रस्तेमार्गे कर्जत ते पनवेल प्रवासासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. मात्र, नव्या रेल्वेमार्गामुळे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षण, रोजगार, उद्योग-व्यवसाय आणि दैनंदिन प्रवासासाठी या रेल्वे मार्गाचा मोठा फायदा होणार असून, कर्जत तालुक्याच्या आर्थिक आणि नागरी विकासालाही नवी चालना मिळणार आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या विस्ताराच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, तो पूर्ण झाल्यानंतर महामुंबईतील उपनगरी रेल्वे जाळ्याची लांबी ४०० किलोमीटरच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, रायगड आणि नवी मुंबईतील लाखो प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news