

नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यातील तसेच कर्जत पूर्व उपवनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या चाफेवाडी-गावंडवाडी परिसरातील आदिवासी व वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची तोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चेनसॉ किंवा कटर मशीनच्या सहाय्याने सागवान वृक्षांची तोड होत असल्याची माहिती गावंडवाडी परिसरात चर्चेत असतानाच सामाजिक कार्यकर्ते तथा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर कारोटे यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून मोठ्या प्रमाणात तोडलेले सागवान लाकूड ताब्यात घेतले आहे.
मनोहर कारोटे यांनी या वृक्षतोडीची माहिती पनवेल येथील सहाय्यक वनसंरक्षक, सागर शंकर माळी यांना दूरध्वनीवरून दिली. त्यांच्या सूचनेनुसार कर्जत पूर्व वनविभागाचे उपवन अधिकारी समीर शिंदे यांनी वनकर्मचाऱ्यांसह संबंधित परिसराची पाहणी केली. यावेळी तोडण्यात आलेल्या सागवान वृक्षांच्या बुंध्यांची नोंद घेण्यात आली. तसेच घटनास्थळी तोडून ठेवण्यात आलेले सागवान लाकूड ताब्यात घेऊन पोई येथील वनविभागाच्या शासकीय डेपोमध्ये जमा करण्यात आले.
दोन प्रकरणांत ३३९ सागवान बुडे नोंद, लाकडे जप्त...
वनविभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तब्बल ३३९ सागवान बुडे जप्त करण्यात आली आहेत. गावनवाडी येथील धारणीमनोर गावंडला यांच्या जमिनीशी संबंधित प्रकरणात ३१२ सागवान बुडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे प्रमाण सुमारे २३ घनमीटर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
संबंधित जमीन आदिवासी खातेदाराची असल्याने या प्रकरणात लागू असलेल्या आदिवासी जमीन तसेच वनकायद्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या प्रकरणात गावंडवाडी येथील सर्व्हे क्रमांक १७/२ मधील भोगवटादार यांच्या जमिनीवरील २७ सागवान बुडे जप्त करण्यात आली आहेत. ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या संबंधित तरतुदींनुसार पुनर्स्थापित करण्यात आलेली असल्याचे वनविभागाने सांगितले. या प्रकरणात भारतीय वन अधिनियमातील कलम २७ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
व्यापारी आदिवासी खातेदारांच्या आडून वृक्षतोड करतात?
या प्रकरणांचा तपास सुरू असताना आदिवासी खातेदारांच्या जमिनीवरील वृक्षतोडीच्या व्यवहाराबाबत एक महत्त्वाचा मुद्दा वनविभागाच्या निदर्शनास आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही व्यापारी आदिवासी खातेदारांकडून झाडांचा व्यवहार करून घेतात; मात्र प्रत्यक्ष वृक्षतोडीच्या वेळी व्यापाऱ्याचे नाव किंवा व्यवहाराचा अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्यास कायदेशीर कारवाईची जबाबदारी संबंधित खातेदारावर येण्याची शक्यता असते, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच आदिवासी खातेदारांनी झाडांच्या मालकीचा अथवा वृक्षतोडीचा कोणताही व्यवहार करताना संबंधित व्यापाऱ्यासोबत लेखी करार करावा आणि त्यामध्ये व्यापाऱ्याचे नाव स्पष्टपणे नमूद करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. भविष्यात नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यापाऱ्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा करार महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असेही कर्जत पूर्व वनविभागाचे अधिकारी समीर शिंदे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
‘माहिती मिळाल्यावरच’ गस्त?
चाफेवाडी-गावंडवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षतोड झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वनक्षेत्रातील नियमित गस्त आणि देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. वनविभागाला सामाजिक कार्यकर्त्याकडून माहिती मिळाल्यानंतर कारवाई झाली असल्याने वनक्षेत्रात नियमित गस्तीदरम्यान ही वृक्षतोड वनविभागाच्या निदर्शनास का आली नाही? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेले सागवान लाकूड शासकीय डेपोमध्ये जमा करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तपासात वृक्षतोड करणारे प्रत्यक्ष इसम, त्यांना लाकूड तोडण्यास प्रवृत्त करणारे किंवा त्यामागे व्यवहार करणारे घटक समोर येतात का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तर जप्ती झाली, लाकूड डेपोत पोहोचले; आता वृक्षतोडीचे मूळ सूत्रधार आणि संबंधित व्यापाऱ्यांपर्यंत वनविभागाचा तपास पोहोचतो का, हाच या प्रकरणातील खरा सवाल आहे.
लाकूड तोडण्याचे आदेश कोणी दिले?
वनविभागाने मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड नेमकी कोणी केली? त्यासाठी कोणाचा व्यवहार झाला होता? वृक्षतोड करणाऱ्यांना लाकूड तोडण्याचे आदेश कोणी दिले? तसेच या प्रकरणामागे व्यापाऱ्यांची भूमिका आहे का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. विशेष म्हणजे, वनविभागाला मिळालेल्या माहितीनंतर घटनास्थळी कारवाई करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष वृक्षतोड करणारे संशयित व्यक्ती कारवाईच्या वेळी हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाकूड जप्त करण्यापलीकडे जाऊन वृक्षतोडीच्या मुळापर्यंत तपास पोहोचणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.