

नेरळ ः शेतकऱ्याचे नशिब की डोळ्यातील साठवलेल्या आशा आगीत जळतेय? असा प्रश्न पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील पाषाणे येथील शेतकऱ्याच्या भाताच्या गंजी वणव्यात खाक झालेल्या घटनेतून उभा राहिला आहे. मान्सूनच्या अनिश्चित आगमनाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, तर परतीच्या पावसाने उरलेसुरले पीकही हातातून सरकवण्याचा प्रयत्न केला. अखेर जे काही शेतात उरले होते, ते दोन घास खाण्याची तरी शेतकऱ्याची आस होती. पण नशिबाने ती ही शेतकऱ्याची आस पेटवून टाकली आहे.
पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील खरवंडे (आदिवासी वाडी) येथील शेतकरी बाळू गोमा दरोडा यांनी खाड्याचा पाडा येथील एका शेतकऱ्याकडून शेत जमीन भातपीक लागवडीसाठी उसनी घेतली होती. वर्षभर पोटाची भूक मारत, कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मेहनत करून पिकवलेल्या भात पिकातील पेंडा मूळ जमीनमालकाला देण्याचे बोलणे निश्चित झाले होते. मात्र आता त्या कापून साठवून ठेवलेल्या भाताच्या सुमारे 150 गंजी वणव्यात जळून राख झाल्या आहेत.
कापलेले पीक शेतात साठवून ठेवलेले असतानाच अचानक लागलेल्या वणव्याच्या आगीत संपूर्ण भातपीक धूर होऊन आकाशात विरून गेले. प्रथमदर्शनी ही आग वनव्यामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच पावसाने झोडपून काढलेले, कसाबसा वाचवलेले आणि कुटुंबाला हातभार लावणारे पीकही आगीत भस्मसात झाल्याने बाळू दरोडा अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
या आगीत शेतकऱ्याकडे न खाण्यासाठी भात उरला, ना पेंडा देण्यासाठी. जे पीक त्याच्या संसाराला आधार देणार होते, तीच भाताची गंजी आता राख होऊन शेतात काळा ढीग बनून उरली आहे. वर्षभराची घाम गाळलेली मेहनत, कष्टाने उभा केलेला पिकाचा आधार आणि भविष्यातील एकमेव आशा ही क्षणात जळून खाक झाली.