

CIDCO Kamothe Water Issue
विक्रम बाबर
पनवेल : कामोठे नोडमधील अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना, सिडकोने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२६ची मुदत दिली आहे. सध्या कामोठेला दररोज सरासरी ३१ दशलक्ष लिटर पाणी मिळत असून, आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करून हा पुरवठा ४० दशलक्ष लिटर प्रतिदिन करण्याचे लेखी आश्वासन सिडकोने दिले आहे. त्यामुळे १४ ऑगस्टपासून प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोने आंदोलनकर्त्यांना केले आहे.
कामोठे परिसरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब सतू बुधे आणि कैलास रामचंद्र सरगर यांनी सिडको प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पाणीटंचाई दूर न झाल्यास १४ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने १२ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे कामोठ्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि प्रस्तावित उपाययोजनांची माहिती दिली.
सिडकोच्या माहितीनुसार, कामोठे नोडला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने तसेच धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. त्यातच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वेळोवेळी शटडाऊन घेतला जात असल्याने कामोठ्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे सिडकोने स्पष्ट केले.
कामोठे विभागातील पाणीपुरवठ्याचे सध्या दोन स्वतंत्र झोन करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात पाणी पोहोचते, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, गरजेनुसार टँकरची संख्या वाढविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सिडकोने सांगितले.
१० ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून कामोठे नोडसाठी सरासरी ३१ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होत आहे. पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी सिडकोकडून तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. त्यानंतर कामोठेकरांना दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ५ सप्टेंबर २०२६पर्यंतचा कालावधी अपेक्षित असल्याचे सिडकोने पत्रात स्पष्ट केले आहे.
कामोठे सेक्टर-२१ येथे सिडकोकडून ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन महिन्यांत हा जलकुंभ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सेक्टर १६, १७, १८ आणि २१ मधील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय सेक्टर ३४, ३५ आणि ३६ येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू करण्याचे नियोजन सिडकोने केले आहे.
दरम्यान, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली पाणी कपात मागे घेऊन कामोठ्याचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, यासाठी सिडकोकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर कामोठे विभागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
सिडकोने दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्टपासून सेक्टर-३४ येथील आयसीआयसीआय बँकेसमोर किंवा कामोठे वॉर्ड कार्यालयासमोर प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ५ सप्टेंबरपर्यंत ४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याचे आश्वासन सिडको प्रत्यक्षात कितपत पूर्ण करते, याकडे आता कामोठेकरांचे लक्ष लागले आहे.
सिडकोने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर १४ ऑगस्टरोजी घोषित केलेले आमरण उपोषण आम्ही स्थगित करत आहोत. मात्र, सिडकोने दिलेला शब्द पाळला नाही, तर ५ सप्टेंबरनंतर पुन्हा आमरण उपोषण तीव्र करण्यात येईल.
- रावसाहेब बुधे, सामाजिक कार्यकर्ते