

नेवाळी : कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच रविवारी या रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली होती. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कल्याण फाटा चौकापासून डायघर, पडले गावापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
राँग साईडने घुसणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडीत आणखी भर पडत असताना नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण शिळ रस्ता हा कल्याण-डोंबिवली, डोंबिवली, बदलापूर शिळफाटा, पलावा आणि नवी मुंबई परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत योग्य नियोजन होत नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून प्रत्येक वेळी केली जात आहे. रविवारी सकाळपासूनच कल्याण फाटा चौक ते डायघर गाव या पट्टयात वाहनांच्या रांगा लागल्याचे समोर आले. आजू बाजूच्या जोड रस्त्यांवरही वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही वाहनचालक डायघर चौकाच्या परिसरातून विरुद्ध दिशेने वाहने घुसवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडथळे निर्माण होतात आणि वाहतुकीचा वेग आणखी कमी होत आहे. या प्रकारांवर यापूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींच्या बैठकीतही उपाययोजनांबाबत चर्चा झाली होती. मात्र, राँग साईडने होणारी वाहतूक पुन्हा वाढल्याने कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पुन्हा एकदा प्रचंड वाढवली आहे.
या कोंडीचा फटका केवळ कामावर जाणाऱ्या किंवा घरी परतणाऱ्या नागरिकांनाच बसत नाही, तर रुग्णवाहिकांनाही त्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचे दिसून आले आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळणे अत्यावश्यक असताना अशा प्रकारची कॉडी चिंतेचा विषय ठरत आहे. कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे
आपत्कालीन वाहनांना मार्ग हवा...
दरम्यान वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिकांकडून जनआंदोलन आणि वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी केवळ बैठका आणि अधूनमधून कारवाई न करता सातत्यपूर्ण अंमलबजावणी, राँग साईडला प्रतिबंध आणि आपत्कालीन वाहनांसाठी मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अन्यथा या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.