

कळंबोली : कळंबोली वसाहती मध्ये ठीक ठिकाणी फुटपाथवर बेकायद्या टपऱ्या मांडून अनधिकृतपणे व्यवसाय केले जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बेकायदा टपऱ्या शोधून काढून त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्याची मागणी कळंबोलीतील भाजपच्या नगरसेविका बायजाबाई बबन बारगजे यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे एका लेखी पत्रानुसार केली आहे.तसेच कळंबोली मध्ये भरणाऱ्या बेकायदा आठवडे बाजारही महापालिकेने कारवाई करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
या फेरीवाल्यांच्या मुळे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे.याबाबत अनेक नागरिकांनी ओरडही केली आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्याच्याबद्दल बातम्याही झळकल्या आहेत. परंतु तकलादू कार्यवाही करून पुन्हा येरे माझ्या मागल्याचाच अनुभव कळंबोलीकरांना नित्याचा झाला आहे.
कळंबोलीत फेरीवाल्यांबरोबरच प्रभाग आठ मध्ये बेकायदा आठवडे बाजार भरणाऱ्या मुळे ही कायदा सुव्यवस्थाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. बेकायदेशीरपणे भरणाऱ्या आठवड्या बाजारावर अर्थहीन दृष्ट्या दुर्लक्ष का केले जात आहे असा यक्ष प्रश्नही नागरिकांनी नगरसेविका बायजाबाई बारगजे यांच्याकडे मांडला आहे. बेकायदा भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊन बाजाराच्या आजूबाजूला वाहतूक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
आठवडे बाजार भरल्यानंतर तेथे टाकण्यात आलेला कचराचाही त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो. पालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभागाची गाडी ही कायम कळंबोली मध्ये तैनात असते मग बेकायदेशीरपणे चालणारे व्यवसाय त्यांना का बरे दिसत नाहीत असा यक्ष प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. रस्त्याच्या बाजूला गाड्या लावून त्याच्यात राजरोस व्यवसाय केला जातो. काही दिवसापूर्वी महापालिकेने दंडात्मक कारवाई करून या रस्त्यामधील गाड्या हटवल्या होत्या.परंतु या गाड्या पुन्हा दिमाखाने उभ्या राहून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी प्रभाग आठ मधील नगरसेविका बायजाबाई बारगजे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी महापौर नितीन पाटील यांची भेट घेऊन एका लेखी पत्रानुसारच कळंबोलीतील बेकायदा फेरीवाले,रस्त्यावर थाटण्यात आलेल्या बेकायदा टपऱ्या आणि बेकादेशीर भरणाऱ्या आठवडे बाजार वर त्वरित कायदेशीर कारवाई करून जनतेला चांगल्या नागरिक सुविधा देण्याची ही मागणी केली आहे.
महापौर नितीन पाटील यांनी महापौर पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्याच घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये बेकायदेशीरपणे चालणारे आठवडे बाजार वर कारवाई करण्यासाठी सक्त सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
वाहतूककोंडीवर परिणाम
कळंबोली वसाहती मधील पदपथावर बेकायदा पणे फेरीवाले तसेच अनधिकृतपणे टपऱ्या मांडून राज रोज व्यवसाय केले जातात. त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांच्या समाज जीवनावर प्रकर्षाने होत असलेल्या दिसून येत आहे. बेकायदेशीर टपऱ्या अनफेरी वाल्यांनी पदपथ काबीज केल्यामुळे नागरिकांना फिरणे ही मुश्किल झाले आहे. भर रस्त्यांमध्येच व्यवसाय थाटून बसल्यामुळे त्याचा परिणाम वाहतूक कोंडी मध्ये होताना दिसत आहे.