

उरण: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटी बंदरातील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी सकाळी एक भयंकर दुर्घटना घडली. तेलाची पाईपलाईन साफ करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हवेच्या प्रचंड दाबामुळे पाईपलाईन साफ करणारा 'चॉपर' उडून अंगावर पडल्याने हा अपघात झाला असून, या घटनेमुळे बंदर परिसरात आणि कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे उपस्थित केला जात आहे.
रविवार, सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर तेलवाहिनी साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी ‘पिगिंग’ या तांत्रिक प्रक्रियेअंतर्गत पाईपलाईनमधील साचलेले अवशेष आणि अशुद्धी काढून टाकण्याचे काम सुरू असताना अचानक हा अपघात झाला.
पाईपलाईनमध्ये साचलेला कचरा साफ करण्याचे काम सुरू असताना हवेच्या प्रचंड प्रेशरमुळे पाईपमध्ये अडकलेला आणि कचरा साफ करणारा जड ‘चॉपर’ अचानक उडून तिथे कार्यरत असलेल्या दोन कामगारांच्या अंगावर थेट आदळला. या फटक्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले. सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि त्यांना उपचाराकरिता जेएनपीए रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या भीषण दुर्घटनेत ओरिअन्ट कंपनीचे कर्मचारी जगन्नाथ गावंड (वय ५५, रा. पिरकोन, उरण) आणि बेंजोप्लास्ट कंपनीचे लोडिंग मास्टर राजेंद्र शिंदे (वय ३५, मूळ रा. लांजा, जि. रत्नागिरी) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या पार्थिवांवर आवश्यक ती वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर जेएनपीए बंदर परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिगिंगसारख्या अत्यंत धोकादायक स्वरूपाच्या कामांदरम्यान कंपन्यांच्या सुरक्षा उपाययोजना कितपत प्रभावी आहेत, कर्मचाऱ्यांना अशा संवेदनशील कामांचे पुरेसे प्रशिक्षण दिले जाते का, तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा घटनास्थळी सज्ज असते का, याबाबत आता तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पिगिंग प्रक्रियेदरम्यान नेमका तांत्रिक बिघाड झाला की सुरक्षा नियमांचे पालन करण्यात काही त्रुटी राहिल्या, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी संबंधित यंत्रणांनी पाहणी केली असून अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास अधिक वेगाने करत आहेत.