JNPA Traffic Jam: जेएनपीए परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा; १२ ते २४ तास वाहनांच्या रांगा

ऐन दिवाळीत वाहनचालक, नागरिक वेठीस; प्रशासन उदासीन
JNPA Traffic Jam
JNPA Traffic JamPudhari
Published on: 
Updated on: 

उरण: जेएनपीए बंदर परिसरातील एम्प्टी कंटेनर यार्ड्‌समध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, येथील यार्ड्‌सबाहेर १२ ते २४ तासांपर्यंत लांबच लांब ट्रॅफिक जाम लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

या भीषण वाहतूक कोंडीमुळे कंटेनर चालक, मालवाहतूकदार व सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत अशी गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

जेएनपीटी आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या एम्प्टी कंटेनर यार्ड्‌समध्याे वाहनांची ने-आण करताना योग्य नियोजन व शिस्तीचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. बंदर व कंटेनर हाताळणी प्रणालीतील विस्कळीत कारभारामुळे वाहनचालकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांविना तासनतास कोंडीत अडकून पडल्यामुळे चालकांना मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

JNPA Traffic Jam
Dharavi industrial hub: धारावी झोपडपट्टी नव्हे, तर उद्योग नगरी..! चामड्याच्या वस्तूंपासून मातीच्या पणत्यांपर्यंतची निर्मिती

यार्ड्समधील ढिसाळ व्यवस्थापनाचा मोठा फटका उरण व जेएनपीटी परिसरातील स्थानिक रस्ते वाहतुकीलाही बसत आहे. महामार्गांवर व अंतर्गत रस्त्यांवर कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे स्थानिक नागरिक व दिवाळीनिमित्त प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. या समस्येमुळे मालवाहतूक व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून वेळेवर कंटेनर न पोहोचल्यामुळे औद्योगिक व लॉजिस्टिक क्षेत्रालाही फटका बसत आहे.

तालुक्यातील जेएनपीए बंदर, विविध औद्योगिक कंपन्या आणि वाढत्या व्यावसायिक हालचालींमुळे उरण परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बंदराशी संबंधित अवजड वाहने, कंटेनर ट्रेलर, मालवाहू ट्रक तसेच खासगी वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यांवर असते. मात्र, वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता पुरेशी नसल्याने अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

JNPA Traffic Jam
RMC Plant Licence Renewal: धक्कादायक! बदलीच्या दिवशीच केले आरएमसी प्लांटचे नूतनीकरण

विशेषतः बंदराकडे जाणारे मार्ग, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते तसेच शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा फटका स्थानिक नागरिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना बसत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे प्रवासासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असून, मालवाहतुकीवरही परिणाम होत आहे.

उरण तालुक्यात औद्योगिक आणि बंदरविकासाबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्गांची निर्मिती आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे.

तसेच वाहतूक पोलिसांची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करून कोंडीच्या ठिकाणी योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बंदर आणि औद्योगिक विकासाला पूरक रस्ते व्यवस्था उभारणे ही काळाची गरज बनली आहे.

JNPA Traffic Jam
Dharavi industrial hub: धारावी झोपडपट्टी नव्हे, तर उद्योग नगरी..! चामड्याच्या वस्तूंपासून मातीच्या पणत्यांपर्यंतची निर्मिती

संबंधित यंत्रणांचे अद्यापही मौन

एकीकडे नागरिक आणि चालक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना, जेएनपीटी प्रशासन व संबंधित यंत्रणा अद्यापही या प्रकरणावर मौन बाळगून असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन दिवाळीत आणि सणासुदींच्या दिवसांत तरी प्रशासनाने ही वाहतूक तात्काळ सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी संतप्त प्रवाशांसह वाहनचालक व वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.