

धारावी: आशियातील खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीची आता मुंबईतील महत्त्वपूर्ण औद्योगिक व आर्थिक बाजारपेठ अशी ओळखही आहे.
धारावीमध्ये सुमारे पाच हजार व्यावसायिक आस्थापना आणि १५ हजार लहान उत्पादन युनिट्स असून, विविध उद्योगांमधून सुमारे अडीच लाख लोकांना रोजगार किंवा उपजीविकेचे साधन मिळते. धारावीतील उद्योगांची एकत्रित उलाढाल १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
धारावीतील उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेसोबतच परदेशातही मागणी आहे. सध्या धारावी पुनर्विकासाच्या टप्प्यातून जात आहे. कदाचित जुन्या धारावीची ही शेवटची दिवाळी ठरण्याची शक्यता आहे. दिवाळीसाठी लागणार्या असंख्य वस्तू धारावीमध्ये तयार होतात. त्यात पणत्यांसह चामड्याच्या वस्तू तसेच भेट वस्तूंचाही समावेश आहे.
चामड्याच्या वस्तूंची बाजारपेठ ही येथील उद्योगांची प्रमुख ओळख आहे. धारावीतील चामडे उद्योगात १५ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. धारावी परिसरात महिलांच्या पर्स, हँडबॅग, पाकिटे, बेल्ट, बूट, चप्पल, जॅकेट आणि विविध प्रकारच्या चामड्याच्या वस्तू तयार होतात.
स्थानिक चर्मकार तसेच कुशल परप्रांतीय कारागीर या उत्पादनांची निर्मिती करीत असून त्याची देशभरात मागणी आहे. काही वस्तू संपूर्ण पॅन इंडियासह अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह परदेशातील बाजारपेठेतही जातात.
भेटवस्तूंची बाजारपेठ रोजगाराचे केंद्र
धारावीतील भेटवस्तू तयार करणारे लघुउद्योग हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येथे कापडी पिशव्या, पर्स, पाकिटे, लॅपटॉप बॅग, विविध फॅशन अॅक्सेसरीज, सजावटीच्या वस्तू आणि कंपन्यांसाठी आकर्षक कॉर्पोरेट भेटवस्तू तयार केल्या जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीचे नाव, लोगो, रंग आणि डिझाइन असलेल्या वस्तू तयार करून दिल्या जातात.
वाढदिवस, लग्नसमारंभ, सण-उत्सव तसेच कंपन्यांच्या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेतल्या जातात. या व्यवसायातून स्थानिक उत्पादक, कारागीर, शिवणकाम करणारे कामगार आणि पॅकिंग कामगारांना रोजगार मिळतो.
पुनर्वापर उद्योगापासून खाद्यपदार्थ निर्मितीपर्यंत
धारावीची औद्योगिक व्याप्ती एवढ्यावरच थांबत नाही. प्लास्टिक, कागद, धातू, रबर आणि इतर टाकाऊ वस्तूंचे वर्गीकरण व पुनर्प्रक्रिया करणारे उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर कपडे शिवणे, भरतकाम, रेडिमेड गारमेंट्स, कृत्रिम दागिने, पापड, लोणची, फरसाण आणि विविध खाद्यपदार्थ तयार करणारे लघुउद्योगही कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे केवळ उत्पादनच होत नाही, तर वाहतूक, पॅकिंग, कच्च्या मालाचा पुरवठा आणि विक्री अशा अनेक पूरक व्यवसायांनाही चालना मिळते.
पुनर्विकासात उद्योगांचे भवितव्य काय?
धारावीच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू असताना येथील उद्योगांचे भवितव्य हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. धारावीतील अनेक व्यवसाय हे लहान जागेत, मर्यादित सुविधांमध्ये आणि पिढ्यान्पिढ्यांच्या कौशल्याच्या जोरावर सुरू आहेत.
या उद्योगांना केवळ पर्यायी जागा देणे पुरेसे ठरणार नाही, तर उत्पादन, साठवणूक, मालाची वाहतूक, कच्च्या मालाची उपलब्धता आणि बाजारपेठ यांचाही विचार करावा लागणार आहे.
धारावीतील चामड्याचे कारागीर, कुंभार, छोटे उद्योजक, व्यापारी आणि कामगार यांच्या रोजगाराचे संरक्षण पुनर्विकासाच्या नियोजनात प्राधान्याने होणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ इमारतींचा विकास होईल; मात्र धारावीची पारंपरिक औद्योगिक ओळख आणि रोजगाराची साखळी धोक्यात येऊ शकते.
धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर हजारो उद्योग आणि लाखो कष्टकरी हातांच्या श्रमातून उभी राहिलेली आर्थिक नगरी आहे. येथील गल्ल्यांमध्ये केवळ घरे नाहीत, तर उद्योगांची स्वप्ने, पिढ्यान्पिढ्यांचे कौशल्य आणि लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन दडलेले आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना येथील रहिवाशांसोबतच उद्योग, उद्योजक, कारागीर आणि कामगारांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हीच खरी विकासाची कसोटी ठरणार आहे.
१० ते १२ कोटी दिव्यांची विक्री
कुंभारवाड्यात दिवाळी पणत्यांची निर्मिती धारावीतील कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या वस्तूंच्या निर्मितीचा महत्त्वाचा परिसर आहे. येथे माठ, मातीची भांडी, कुंड्या, मूर्ती, शोभेच्या वस्तू आणि विविध आकारांच्या पणत्या तयार केल्या जातात. विशेषतः दिवाळीच्या काळात याठिकाणी मोठी लगबग पाहायला मिळते.
पारंपरिक पणत्यांसोबतच रंगीत, नक्षीदार, आकर्षक फॅन्सी दिवे, सजावटीच्या पणत्या आणि आकाशकंदील तयार करण्याचे काम येथे केले जाते. मातीला आकार देण्यापासून ते रंगकाम, सजावट आणि पॅकिंगपर्यंत अनेक टप्प्यांत स्थानिक कारागीर आणि महिलांचा सहभाग असतो.
कुंभारवाड्यात वर्षाला सुमारे १० ते १२ कोटी दिव्यांची विक्री होते. यातील काही उत्पादनांची परदेशातही निर्यात होते. आधुनिक सजावटीच्या वस्तूंच्या स्पर्धेत पारंपरिक मातीच्या पणत्यांनी आपली बाजारपेठ टिकवून ठेवली आहे.धारावी कुंभारवाड्यात दिवा तसेच इतर साहित्याची निर्मिती वर्षभर चालते. धारावीत हजारोच्या संख्येने कुंभार समाज राहतो. प्रत्येक घरात दिवा तयार करणे व इतर कामे सुरु असते. शेकडो परप्रांतीय मजुरांची देखील या कामात होते. वर्षाला एक ते पन्नास करोडची उलाढाल होते.
- आदम जाला, स्थानिक कुंभार
परप्रांतीय बिहारीं कामगार आल्यापासून मराठी समाज बांधव या व्यवसायापासून दूर गेला आहे. परप्रांतीय कारागीरांमुळे तसेच ऑनलाईनमुळे बार्गेनिंग वाढली. दहा वर्षांपूर्वी जो भाव मिळत होता त्याच भावाने आज देखील चामड्याच्या पाकीट, लेडीज पर्स आदिची विक्री करावी लागत आहे.
-गणेश कांबळे, स्थानिक चामडा उद्योजक