

अलिबाग: भारतीय हवामान विभागाने कोकणातील रायगडसह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यात २९ जून ते ३ जुलैदरम्यान बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत पावसाची शक्यता 'अत्यंत संभव' असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगडमध्ये २९ जून, ३० जून आणि १ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. २ जुलै रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. ३ जुलै रोजीही जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी २९ जून रोजी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून तेथे काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस ऑरेंज अलर्टसदृश परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना नदी-नाले, धबधबे आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळण्याचे, तसेच अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनीही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.