

मिलिंद कदम
माथेरान: माथेरान येथे मागील काही दिवसांपासून अश्वचालक व ई-रिक्षा चालक यांच्या एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर आता लवकरच अंतिम सुनावणी होणार असल्याचे संकेत मिळत असून हा निर्णय झाल्यानंतर समस्त माथेरान करांना त्याचा परिणाम भोगावा लागणार असून ई-रिक्षाबाबत व अश्व संख्या मर्यादित असणे व येथील अनधिकृत बांधकाम यांना प्रामुख्याने त्याचा फटका बसणार आहे.
माथेरान नगरपालिकेने एक विशेष सभा घेतली असून राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावर माथेरान नगरपरिषदेच्या सभेत महत्वपूर्ण निर्णय घेताना. घोड्यांची संख्या कमी करणे, घोड्यांचे रूट निश्चित करणे व ई टेम्पो सुरु करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे व केतन रामाणे यांनी दाखल केलेल्या राष्ट्रीय हरित लवादातील याचिकेवर 9 जून रोजी सुनावणी झाली अश्वपाल संघटना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व माथेरान नगरपरिषद यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय हरित लवादाने माथेरान पालिकेस आदेश जारी केले आहेत.
लोनेर, माणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाच्या तज्ञ् प्राध्यापकांनी घोड्याच्या लिदीचे पावसाळ्या पूर्वी व पावसाळ्या नंतर शास्त्रोक्तरीत्या निरीक्षण केले यामध्ये घोड्याच्या विष्टे मुले पाणी, हवा व माती सर्वच प्रदूषित झाले असल्याचा अहवाल कोर्टाला सादर केला आहे.
सदर अहवालामध्ये सुचविण्यात आलेल्या तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी माथेरान नगरपरिषद कश्या प्रकारे करणार आहे, याचे प्रतिज्ञापत्र लवादाने सादर करण्यास सांगितले आहे. 25 जून रोजी नगराध्यक्ष्य चंद्रकांत चौधरी यांनी नगरसेवकांची विशेष सभा आयोजित केली होती या सभे मध्ये मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी हरित लवादाच्या आदेशाची सविस्तर माहिती सदस्याना दिली.
चर्चेमध्ये नगरसेवक मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, सीताराम कुंभार, किशोर मोरे, लता ढेबे, सोहेल महापुळे, प्रतिभा घावरे यांनी विविध उपाययोजना सांगितल्या. अश्वपाल संघटने सोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे त्याच प्रमाणे रोजची सात ते आठ टन लीद संकलित करण्यासाठी ई टेम्पो सारख्या वाहनाची आवश्यकता लागणार आहे.
मालवाहतूक च्या घोड्याना दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होऊ शकते या पर्यायावर ही चर्चा करण्यात आली. हरित लवदाची पुढील सुनावणी 16 जुलै रोजी आहे माथेरान हे पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे या केसला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पाणी दूषित होण्याच्या विषयावर चर्चा
जवळ जवळ 800 घोड्याच्या लिदीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करणे, टप्प्या टप्प्याने घोड्यांची संख्या कमी, घोड्यांसाठी प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, घोड्यांचे तबेले रहिवाशी वसतितुन सुरक्षित ठिकाणी हलवणे व पाण्याचे प्रमुख तलाव शार्लोट लेक व सिम्पसन टॅंक या परिसरातून घोडे दूर ठेवणे विशेषतः पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहा सोबत घोड्याची लीद या पाणी पिण्याच्या तलावंमध्ये जाते व पाणी दूषित होते या विषयांवर चर्चा झाली.