

पनवेल : विक्रम बाबर
प्रतिबंधित ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 12 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विविध बँकांच्या तब्बल 886 खात्यांचा वापर करून ही टोळी बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने या अटक केलेल्या बारा आरोपीकडून तब्बल 18 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ऑनलाइन गेमिंगच्या आडून काही आरोपी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करीत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. या फसवणूक करणाऱ्या मधील एक आरोपी नवी मुंबई परिसरातील सीबीडी रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार राहुल पवार यांना मिळाली होत्या, त्या आधारे पोलिसांनी सीबीडी रेल्वे स्टेशन परिसरातून एका इम्रान उस्मानी मीनहज शेख (वय 22) या संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केल्याची कबुली दिली. पुढील तपासात या रॅकेटमागे 12 जणांचा गट कार्यरत असल्याचे उघड झाले.
या टोळीच्या ताब्यातून 52 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 99 डेबिट कार्डे, 64 बँक पासबुक तसेच 1 टाटा सफारी स्टॉम कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत सुमारे 9 लाख 54 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. एनसीआरपी पोर्टलवर मिळालेल्या 393 तक्रारींपैकी अनेक तक्रारी या ऑनलाइन फसवणूक रॅकेटशी संबंधित आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी
इम्रान उस्मान मीनहाज शेख (22, नेरुळ ),हितेश पुनाराम देवांगन (28, छत्तीसगड),सुनील श्रवण देवांगन (23),तोमेश कुमार उईके (22),राहुल देवांगन (वय 21),अंकित रमेश सिंग (वय 23),अभिषेक सिंग (वय 23),हरिष कुमार सिंग (वय 27),अर्पित सोनवणी (वय 23),रजत शर्मा (वय 24, बिहार), लालबाबू कुमार (वय 21, दिल्ली), कृष्णाअंशू विश्वास (वय 22).