

खोपोली : ताकई - महड रस्त्यावरील खासगी जागेत अवैध गुटखा साठा असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरूवार दि. 26 तारखेला रात्री दिड वाजण्याच्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करीत अंदाजे लाख रूपयाचा गुटखा साठा पकडून दिला आहे. रिपब्लिकन सेना अन्न व प्रशासन विभाग आणि खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पान मसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखु मालाचा साठा व विक्री करण्यासाठी बंदी असतानाही खोपोलीसह खालापूर तालुक्यात पानटपरीवर गुटखा विक्री जोरात सुरू आहे.
सदर अवैध गुटखासाठा ताकई - महड रस्त्यावरील खासगी जागेतील रूम आणि कंटेनरमध्ये करीत असल्याची गुप्त माहिती पॅंथर आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सुशीलभाई जाधव, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम, जिल्हा महासचिव पंचशील शिरसाट, पॅंथर आर्मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आशिष सुरेश खंडागळे, पनवेल शहराध्यक्ष आरिफ भाई राऊत यांनी गुरूवारी 26 जून ला रात्री दिड वाजण्याच्या सुमारास स्टिंग आँपरेशन करीत घटनास्थळी पोहचले.
यावेळी गुटख्याने भरलेला टेम्पो चालक फरार झाला त्यानंतर रात्रभर घटनास्थळी थांबून राहिले होते. सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांच्यासह 13 अधिकारी, कर्मचाऱ्यांची टिम, खोपोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजीत व्हांयबराळे आणि पोलिस पोलिस टिमने कारवाई करीत दोन खोल्या आणि कंटेनरचे कुलूप उघडले असता अंदाजे लाख रूपयाच्या आसपास मुद्देमाल आणि मालाची वाहतुक करण्यासाठी वापरली जाणारी स्कुटी एमएच -46 सी,एफ 8852 जप्त केली आहे. या प्रकरणात गुटखा किंग बडेमासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुटखा विक्री करणारे आरोपी फरार असून यांच्या विरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.