

महाड : महाड औद्योगिक वसाहती मधीलमधील बेलगाम प्रदूषणाने पुन्हा एकदा काळ नदीच्या जिवावर उठले आहे. रासायनिक कंपन्यांच्या मुजोरीचा फटका निसर्गाला आणि सामान्य माणसाला बसत असून काळ नदीपात्र अक्षरशः माशांच्या सडलेल्या प्रेतांनी भरून गेले आहे. मेलेले आणि तडफडणारे मासे पकडण्यासाठी नदीकाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे, पण हा 'मासा' जीवघेणा ठरू शकतो, असा गंभीर इशारा स्थानिक सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी जनतेला दिला आहे.
चालू पावसाळी मोसमातील या पहिल्याच घटनेची प्रदूषण मंडळाने गंभीर दखल घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत असून मंडळाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात प्राप्त झालेली सविस्तर बातमी अशी की महाड औद्योगिक वसाहती मधील प्रदूषणकारी कारखान्यांचा हैदोस पुन्हा उघड झाला आहे.
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत विषारी रासायनिक सांडपाणी थेट काळ नदीत सोडण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उन्हाळ्यात कंपनीच्या आवारात साचवून ठेवलेले घातक रसायनांचे पाणी पावसासोबत नदीत मिसळल्याने जलचरांचा अक्षरशः कत्तलखाना झाला. नदीपात्रात हजारो मृत मासे तरंगताना दिसत आहेत
महाड एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीच्या मागे वाहणाऱ्या रासायनिक पाण्याचा मुद्दा यापूर्वी चर्चिला आला असतानाच त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यातील आणि कंपनीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले होते.
नाल्यात साचलेले तेच विषारी पाणी आता नदीत मिसळले आणि माशांचा जीव घेतला, असा थेट आरोप ग्रामस्थ करत आहेत. 'नमुने घेतले, अहवाल आला, पण कारवाई शून्य' - हा मंडळाचा गलथान कारभारच या पर्यावरणीय हत्याकांडाला जबाबदार आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाच्या नावाखाली रातोरात विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात? या सर्वा बरोबरच काळ नदीचे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी वापरणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?असे प्रश्न अनुत्तरित असून महाड एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.
एकीकडे रोजगाराचे आमिष, दुसरीकडे मृत्यूचे रसायन. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेला हा विषारी खेळ तात्काळ थांबवून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मृत मासे खाऊ नका
एकीकडे नदी मृत माशांनी भरली असताना, दुसरीकडे काही नागरिक पिशव्या भरून ते मासे घरी नेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. विषबाधा होऊन मृत्यू ओढवण्याची भीती असताना हा जीवघेणा प्रकार सुरू आहे."हे मासे दूषित रसायनांमुळे मेले आहेत. चुकूनही कोणी ते खाऊ नयेत. आपल्या जीवाशी खेळू नका,"असे आवाहन खरवलीचे सरपंच चैतन्य महामुनकर यांनी केले आहे.