

बोईसर : पास्थळ परिसरातील धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाणगंगा नदीच्या पाण्याचा रंग अचानक लालसर झाल्याचे निदर्शनास आले असून, नदीत मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नदी प्रदूषित झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणगंगा नदीत यापूर्वी अशा प्रकारचा रंगबदल अथवा जलचरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे नदीच्या पाण्यात काही रासायनिक घटक मिसळल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तारापूर औद्योगिक परिसरातील काही नाले खाडीमार्गे समुद्राला मिळतात. भरतीच्या काळात या नाल्यांतील पाणी पुन्हा नदीपात्राकडे येत असल्याने त्याचा परिणाम बाणगंगा नदीच्या पाण्यावर झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी अनेक मोठ्या आकाराचे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर मृत अवस्थेत तरंगताना पाहिल्याचे सांगितले. या घटनेमुळे नदीतील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर उपप्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने घटनेबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, तारापूर औद्योगिक क्षेत्रातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्यांमध्ये सोडले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे बाणगंगा नदीच्या पाण्याची वैज्ञानिक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तसेच प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पर्यावरणीय धोक्याची चर्चा सुरू
नदीच्या पाण्यात झालेला रंगबदल आणि वाढत्या प्रमाणात आढळणारे मृत जलचर पाहता संभाव्य पर्यावरणीय धोक्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि अधिकृत अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.