

पेणशहर (रायगड) : स्वप्नील पाटील
पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना देखील नवी मुंबईला हेटवणे धरणाचे पाणी वेगाने जाण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील जिते ते बेलवडे ग्रामपंचाय त हद्दीतील भूभागातून जलाबोगद्याद्वारे प्रक्रिया युद्धपातळीवर केली आहे. त्यामुळे हेटवणे धरण आमच्या उशाशी आणि ओरड पडली घशाशी अशी अवस्था पेणच्या खारेपाटातील जनतेची असतानाही गेल्या दोन अडीच वर्षापासून सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.
तालुक्याच्या जिते गावापासून हेटवणे धरणापर्यंत असणाऱ्या ग्राम पंचायत हद्दीतील गावांमधून करोडो रुपये खर्च करून जवळपास ३०० मीटर खोल जमिनीखालून पिण्याच्या पाण्याची लाईन उभारून सिडकोद्वारे नवी मुंबईला पाणी देण्याचा नवा प्रकल्प गेल्या दोन अडीच वर्षापासून येथे सुरू केला आहे. मात्र या प्रकल्पाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जात आहे त्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली आहे का, याबद्दलचा मोबदला मिळाला आहे का तसेच येथे करण्यात येणाऱ्या खोदकामाबाबत शासनाची रितसर रॉयल्टी भरून महसूल गोळा झालाय का हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे एकीकडे पेण तालुक्यातील खारेपाट भाग हा हेटवणे धरणाच्या मुबलक पिण्यासाठी वर्षानुवर्ष लढा देत असताना त्यांना आजतागायत
पाणी मिळाले नाही मात्र नवी मुंबईसाठी हेटवणे धरणाचे पाणी येथील जमिनीच्या भूभागातून जलाबोगद्याद्वारे अधिक जोमाने वाहण्यासाठी प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. हेटवणे धरणाचे पाणी पेणच्या खारेपाट विभागाला मिळण्यासाठी वर्क ऑर्डर काढणे आवश्यक असतानाही सिडको करिता ऐवढी घाई का ? तसेच सिडकोच्या पाण्यासाठी पनवेलचे लोकप्रतिनिधी भांडतात मात्र येथील लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत. २०१५८ च्या धरण बचाव कायद्यानुसार धरण क्षेत्र परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतीही खोदकाम करू नये असे असतानाही सदरचे खोदकाम हे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे आणि जोपर्यंत हेटवणे धरणाचे पाणी खारेपाट विभागाला सर्वप्रथम मिळत नाही तोपर्यंत इतर प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबई येथे हे पाणी नेऊ नये अशी आमची मागणी असेल, अशी प्रतिक्रिया नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
हेटवणे ते जिते अशी भूभागातून पाईपलाईन जात आहे. याबाबत बेलवडे येथील सर्वे नंबर २३८ यातील उत्खनन बाबत शासनाची रॉयल्टी भरलेली आहे यात २ हजार ब्रास उत्खनन झाले असून ५०० ब्रास प्रमाणे चार टप्प्यात रॉयल्टी फाडली जात आहे. यात १२ लाख रुपये महसूल जमा झाला असून पुढील पाचशे ब्रास रॉयल्टी देण्याचे काम चालू आहे. यातील एक बाजुच्या प्लॉटमध्ये उत्खनन झाले नसून दुसऱ्या मालकाच्या जागेतील उत्खनन बाबत रॉयल्टी फाडण्यात आली आहे. सदर प्रकल्पाबाबत धरण क्षेत्राला धोका पोहोचेल असे वाटत नाही आणि याठिकाणी कोणत्याही प्रकारचे ब्लास्टिंग केले गेले नाही.
नरेश पवार, वरिष्ठ लिपिक तहसील कार्यालय पेण