

अलिबाग (रायगड) : रायगड जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जलसाठा तुडुंब भरला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २८ धरणांमध्ये सध्या तब्बल ९५.२५ टक्के जलसाठा आहे.
मुरूड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, कर्जत, खालापूर, पनवेल व उरण या तालुक्यांतील बहुतांश धरणांनी १०० टक्के जलसाठा गाठला आहे. सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगाव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कलोते-मोकाशी, डोणवत, आंबेघर, उसरण, मोरबे, अवसरे, बामणोली, ढोकशेत, कुडकी, साळोख या २४ धरणांमध्ये पाण्याची पातळी १०० टक्के झाली आहे. श्रीवर्धनमधील कार्ले धरण ९९ टक्के भरले असून अलिबागमधील श्रीगाव, उरणमधील पुनाडे आणि श्रीवर्धनमधील रानीवली धरणांमध्ये ७५ टक्के पाणी आहे.
मे महिन्यात कोरडेपणामुळे अनेक गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र, जूनपासून सुरू झालेल्या पावसाच्या मालिकेमुळे परिस्थिती बदलली. नदी, तलाव, विहिरी व धरणे पाण्याने भरून गेल्याने ग्रामीण व शहरी भागात तसेच औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ लागला आहे.
गतवर्षीपेक्षा किंचित घट
गतवर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता. यावर्षी तो ९५. २५ टक्क्यांवर आहे. म्हणजेच १.२५ टक्क्यांनी घट झाली आहे. यामागे यंदाच्या जुलै महिन्यात पाऊस काहीसा कमी पडल्याचे कारण सांगितले जात आहे.