

नेरळ: कर्जत तालुक्यातील डिकसळ-पाली येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ सध्या अत्यंत बिकट व गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे गावात दरड कोसळण्याची तीव्र भीती निर्माण झाली असून, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात चाचपडत आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सुमारे ७ ते ८ कुटुंबांना रात्रीच्या वेळी पाली येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या तात्पुरत्या छावणीत ना पिण्याचे पाणी, ना जेवणाची सोय, अशी दुरवस्था असल्याने आपत्तीग्रस्त नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान घरांवर कधीही दरड कोसळून झोपेतच काळ घाला घालेल, या भीतीने गेल्या ५-६दिवसांपासून येथील ग्रामस्थ प्रचंड मानसिक दडपणाखाली आहेत. रात्री २ वाजताच्या सुमारास जेव्हा भीती वाढते, तेव्हा स्थानिक नागरिक रस्त्यावरील साचलेल्या घाण व चिखलाच्या पाण्यातून वाट काढत कसेबसे या जिल्हा परिषद शाळेत धावत येतात.
परंतु, तिथे आल्यावरही त्यांची कोणतीही दखल घेणारे तिथे हजर नसते, स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा पाढा वाचताना अत्यंत गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे गळत असून, संपूर्ण वर्गांमध्ये चिखल आणि पाणी साचले आहे.
त्यामुळे नागरिकांना तिथे साधे बसायला किंवा झोपायलाही कोरडी जागा उपलब्ध नाही. तसेच गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने आधीच गाव अंधारात आहे, त्यात शाळेतही लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे.