Devkund Waterfall Case: देवकुंड दुर्घटनेत २५ जणांवर गुन्हे दाखल; माणगाव पोलिसांचा मोठा दणका

स्थानिक गाईडवर नजर
Devkund Waterfall Case
Devkund Waterfall CasePudhari
Published on
Updated on

कमलाकर होवाळ

माणगाव: भिरा येथील देवकुंड धबधब्यावर दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला असून या प्रकरणात एकूण २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींमध्ये मृत पर्यटका सोबत आलेले सहकारी, स्थानिक गाईड तसेच पर्यटका कडून पैसे घेऊन बुकिंग करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर गाईड तसेच बुकिंग घेणाऱ्या व्यक्ती यांचे धाबे दणाणले आहेत.देवकुंडसह प्रतिबंधित पर्यटन स्थळांवर पर्यटकांना नेण्यासाठी नेमके कोण-कोण बुकिंग घेत आहेत, सोशल मीडियाद्वारे पर्यटकांशी संपर्क साधून त्यांना कोण आकर्षित करत आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल कॉल, ई-मेल आदी माध्यमांतून पर्यटकांना आमिष दाखवून बेकायदेशीर बुकिंग करणाऱ्यांची कसलीही गय न करता लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devkund Waterfall Case
Mahad Illegal Tree Cutting: महाड तालुक्यात बेकायदा वृक्षतोड; लाखो रुपयांच्या लाकडांची विनापरवाना विक्री

माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बांगर म्हणाले की, देवकुंड, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट आणि कुंभे धबधबा या पर्यटनस्थळांवर सध्या प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणा साठी बुकिंग करू नये आणि नागरिकांनीही या परिसरात जाणे टाळावे.

बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच या दुर्घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक दोषीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

या दुर्घटनेनंतरही काही पर्यटक गटांची सोशल मीडियावर बुकिंग सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली असून अशा सर्व ग्रुपवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. प्रतिबंधित परिसराच्या सुमारे एक किलोमीटरच्या परिघात आढळणारे पर्यटक, स्थानिक गाईड किंवा संशयित व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भिरा येथील देवकुंड धबधब्यावर गोपाळ रामलाल राठोड (वय २२) आणि विष्णू विलास ढोख (वय २३) हे दोघे सुमारे ५० फूट खोल पाण्यात अडकून बेपत्ता झाले होते. घटनेनंतर स्थानिक स्वयंसेवक, शेलारमामा रेस्क्यूटीम, एसव्हीआरएसएस पथक, पोलीस आणि इतर बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती.

Devkund Waterfall Case
Devkund Waterfall Incident: देवकुंड धबधब्यात बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह सापडले

मात्र रविवारी सायंकाळी अंधार पडल्यामुळे मोहीम स्थगित करावी लागली. सोमवारी सकाळी पुन्हा अत्याधुनिक उपकरणे आणि पाण्याखाली शोध घेणाऱ्या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली. अखेर सुमारे २४ तासांनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

सोशल मीडियावरील बुकिंग रडारवर

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्यभर हळहळ व्यक्त होत असतानाच प्रतिबंधित पर्यटन स्थळांवरील सुरक्षा, बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी, बेकायदेशीर पर्यटन व्यवसाय आणि सोशल मीडियाद्वारे चालणाऱ्या बुकिंग रॅकेटवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून बेकायदेशीर पर्यटन साखळीतील प्रत्येक घटकाचा शोध घेत कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनानेही नागरिकांना पावसाळ्यात बंदी आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आणि जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटनाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news