

पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत मासेमारी नदीमध्ये गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात चालते मात्र ही मासेमारी बोटीने नाहीतर नदीच्या किनाऱ्यावर जाळीच्या अथवा गळाच्या साह्याने केली जाते. यामध्ये विविध प्रकारचे मासे असून खवल, मळ्या, दांडाळी, पांढरा मासा हे मासे नदीत उन्हाळ्यात गळाने मिळतात मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गणेशउत्सव नंतर काही दिवसांनी नदीत शिंगटी, वांब, शिवडा, माशांचा समावेश असतो व गळाने हे मासे पकडले जातात.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका दुर्गम असून सावित्री, ढवळी, कामथी अशा नद्या येथून वाहतात व यामध्ये मुख्य नदी ही सावीत्री नदी मानली जाते. या नद्यांमध्ये आदिवासी जाळे टाकून बाराही महिने मासेमारी करतात व हे मासे पोलादपूर मुख्य बाजारात विक्रीसाठी आणले जातात व पोलादपुरकर मोठ्या आवडीने हे मासे विकत घेऊन खातात तर काही स्थानिक नागरिक मासे विकत न घेता आवडीने मासे पकडण्यासाठी स्वतः जातात व गळ पद्धतीचा अवलंब करतात. गळ पद्धती म्हणजे एका पातळ बांबूच्या काठीला तंगुस बांधून गळ व शिसे बांधण्यात येतो व या गळाला उन्हाळ्यात पीठ लावून मासेमारी केली जाते तर पावसाळ्यात
गळाला गांडूळ लावून मासेमारी केली जाते व पावसाळी मासेमारीला पोलादपूरकरांची पसंती असल्याचे पाहायला मिळते आहे. गणेशोत्सवानंतर आता काही दिवसांनी पोलादपूरातील स्थानिक नागरिक गळाने मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीकिनारी येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पोलादपुरात बाराही महिने मासेमारी केली जाते मात्र गणेशोत्सवानंतर नदीला गळाने मासेमारी करण्यासाठी पाणी मुबलक असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत मिळणारा 'वांब' व शिंगटी मासा सध्या आदिवासी व पोलादपुरकरांची पसंती ठरत आहे.
आदिवासीना या वांब माशाला पोलादपूर बाजारपेठेत २०० ते २५० रुपये भाव मिळत असल्याने बाजारात विक्रीसाठी हा मासा आणण्यासाठी आदिवासी धडपड करत असतात. या वांब माशाची वैशिष्ट्य म्हणजे हा मासा दुर्मिळ असून वर्षातून फक्त सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यातच मिळतो उर्वरित दहा महिने हा मासा नदीत दिसतही नाही व मिळतही नाही. या माशाची विशेषता म्हणजे मासा दिसायला सबसेल सापासारखा दिसत असून चवीला अत्यंत चविष्ट मानला जातो वर्षातून दोन महिनेच मोठ्या कसरतीचे हा वांब मासा मिळत असल्याने व माश्याचा भाव जास्त असल्याने पोलादपूर स्थानिक नागरिक सायंकाळी गळ घेऊन हा मासा पकडण्यासाठी नदीकाठावर बसत आहेत. वांब माशाला चांगला भाव मिळत असल्याने आदिवासी बांधवांना सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन महिने चांगला रोजगार मिळत असून बाजारात विक्रीला आल्यावर नागरिकांची झुंबड उडते व काही वेळातच सर्व माशे विकले जातात.
वांब मासा महाग असला तरी माशा अत्यंत चविष्ट आहे व नेमक्याच प्रमाणात मासा बाजारात उपलब्ध असल्याने मिळेल त्या भावाला आम्ही विकत घेतो करण हेरवी हा मासा पाहायला सुद्धा मिळत नाही
रोशन दुधाने, ग्राहक
वांब या माशाला चांगला भाव मिळत असून पोलादपुरात नागरिक या माशाची जास्त खरेदी करत आहेत त्यामुळे रोजगार चांगल्या प्रमाणात मिळत आहे.
नीला चव्हाण, आदिवासी
वांब मासा वर्षातून फक्त २ महिनेच हा मासा नदीला मिळतो व अत्यंत चविष्ट असून चुलीवर कालवण चवदार होते व स्वतः गाळाने पकडण्याची एक वेगळीच मज्जा आहे
निवेदन दरेकर, गळाने मासे पकडणारे स्थानिक