

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड खाडीपट्टयात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका आंबा बागायतीला बसू लागला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या हवामानाच्या बदलामुळे अवकाळी आणि वारंवार निमार्ण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडांवर एकही फळ दिसेनासा झाल्याने त्यामुळे यावर्षी हापूस आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार पुरते आडचणीत सापडले असून यावर्षीच्या वार्षिक उत्पन्नावर गदा आल्याने बागायतदारांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या हवामानाच्या बदलामुळे तुरळक झालेल्या अवकाळी पाऊस आणि वारंवार निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे झाडांना आलेला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला. झाडावर एकही आंबा अथवा कैरी दिसेनासी झाली आहे. यामुळे यावर्षी हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असल्याची भीती आंबा बागातदारांनी व्यक्त केली असून आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
यावर्षी हापूसच्या हंगामाला सुरुवातीला अनुकूल परिस्थिती होती, मात्र जानेवारीच्या उत्तरार्धात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला हवामानात वेगाने बदल होत गेला आणि अवकाळी पावसाने तुरळक बरसात केल्याने तसेच वारंवार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहरण्यासाठी आवश्यक असलेले थंडी यावर्षी पुरेशा प्रमाणात पडली नाही. त्याऐवजी अचानक वाढलेल्या तापमानाचा फटका मोहर करपून जाऊन काळा पडला आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. दिवसभर होणाऱ्या तापमानाने आणि सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे मोहरावर तुडतुड्या रोगाची प्रादुर्भाव सुरू झाला होता. झाडांवर मोठ्या प्रमाणात मोहर आला असताना, मात्र प्रतिकूल हवामानामुळे आलेला मोहर काळा पडून पूर्णत: गळून गेला आहे. काही प्रमाणात फळधारणा होणार आणि अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे आंबा बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
दरवर्षी हवामान बदलामुळे बागा वाचवण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावी लागते. मोहर टिकवण्यासाठी बागायतदार सात ते आठ वेळा फवारणी करतात, ज्यामुळे औषधांवरील खर्च दुपटीने वाढला आहे. मजुरांची टंचाई आणि वाढलेले दर यामुळे बागायतदारांचे गणित कोलमडले आहे. अनेक बागायतदारांनी बँकांकडून आणि सोसायट्यांकडून कर्ज घेऊन बागा जोपासल्या आहेत, मात्र आता उत्पादनाची खात्री नसल्याने कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
खाडीपट्टयातील हापुस आंब्यांची मागणी मोठया प्रमाणात असून देशाच्या बाहेर देखील मागणी या आंब्याला असल्याचे बागायतदारांनी सांगितले. मात्र, उत्पादनात घट झाल्यामुळे यंदा बाजारात हापूस येण्याची शक्यता कमीच आहे, मात्र कमी प्रमाणात येणाऱ्या हापूसच्या दरांवर यावर्षी मोठा परिणाम होणार असून, सामान्यांच्या खिशाला हापूस यंदा अधिक महाग पडण्याची चिन्हे आहेत वाटत आहेत.दरम्यान, हवामानाच्या लहरीपणाचा फटका आंबा बागायतदारांना बसला असून लाखो रुपयांची उचल करुन आंबा बागायती जोपासाव्या लागतात, मात्र दरवर्षी होणाऱ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पुरता आंबा बागायतदार हवालदिल झाला असून आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.