

Alibaug Mallakhamb Dahi Handi Tradition
जयंत धुळप
रायगड : समुद्राशी सातत्याने झुंज देणाऱ्या अलिबागच्या कोळी समाजाने आपल्या कल्पकतेतून एक आगळीवेगळी परंपरा निर्माण केली आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी सुरू झालेली ग्रीस लावलेल्या मल्लखांबावरची दहीहंडी ही राज्यातील एकमेव आणि अनोखी दहीहंडी मानली जाते.
कोळी बांधवांना समुद्रात मच्छिमारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या अडचणींवर तात्काळ उपाय शोधण्याची सवय त्यांच्यात उपजतच आहे. पूर्वी मच्छिमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या लाकडी खांबावर ग्रीस लावून दोरखंड फिरवले जात. याच दैनंदिन अनुभवातून ग्रीस लावलेल्या मल्लखांबावर दहीहंडी फोडण्याची कल्पना कोळी समाजात रुजली.
गोपाळकाल्याच्या दिवशी, अलिबाग कोळीवाड्यातील मच्छिमार सोसायटीच्या शेजारील पटांगणात हा मल्लखांब उभारला जातो. संपूर्ण मल्लखांब ग्रीसने माखला जातो आणि त्याच्या टोकाला दोरांच्या सहाय्याने दहीहंडी बांधली जाते. गोविंदांना क्रमांक देऊन, प्रत्येकजण ग्रीसने माखलेल्या मल्लखांबावरून वर चढण्याचा प्रयत्न करतो. ग्रीस लावल्यामुळे अनेकदा गोविंदा घसरून खाली येतो, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर कोणीतरी हंडी फोडतो.
दरवर्षी ७० ते ८० गोविंदा या स्पर्धेत भाग घेतात. पाच फेऱ्यांनंतर मल्लखांबावरील ग्रीस कमी होत जाते आणि शेवटी एखादा गोविंदा यशस्वी होतो. विजेत्या गोविंदाला कोळी समाज मंडळाकडून मोठ्या रकमेचे पारितोषिक दिले जाते. दुपारी तीन वाजता सुरू होणारी ही स्पर्धा रात्री बारा वाजेपर्यंत रंगते.
राज्यातील एकमेव ग्रीसच्या मल्लखांब दहीहंडीचे आकर्षण इतके आहे की अलिबाग आणि आसपासच्या परिसरातील तसेच जिल्ह्याबाहेरील शौकिनही हा थरार अनुभवण्यासाठी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. यंदाही शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
कोळी समाजाच्या कल्पकतेतून साकारलेली ही ग्रीसच्या मल्लखांब दहीहंडी आजही तितक्याच उत्साहाने आणि थरारात साजरी केली जाते, हेच या परंपरेचे वैशिष्ट्य आहे.