

Gokulashtami Traditional Celebrations Konkan Alibaug
जयंत धुळप
रायगड : कोकणातील सणांना प्राचीन परंपरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरा पिढ्यान्पिढ्या श्रद्धेने जपल्या जातात आणि त्यातलीच एक विलक्षण प्रथा म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी गोविंदांच्या अंगात श्रीकृष्णाचा संचार होण्याची म्हणजेच या दिवशी गोविंदाच्या अंगात प्रत्यक्ष श्रीकृष्ण किंवा कान्होबा येतो, अशी आख्यायिका आहे. त्यावेळी त्या गोविंदावर आसूडाचे फटके मारले जातात, आणि हे फटके श्रीकृष्णच झेलतो, असा भाव असतो. त्यामुळे गोविंदाच्या पाठीवर कोणतीही जखम किंवा व्रण दिसत नाही, असे सांगितले जाते.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रेवदंडा, शहापूर, सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा या गावांमध्ये ही प्राचीन आणि अनोखी परंपरा आजही जिवंत आहे. श्रीकृष्णाचे वारे संचारलेल्या गोविंदाची महिला भक्तिभावाने पूजा करतात. त्यावेळी त्या महिलांना आपण श्रीकृष्णाचीच पूजा करत आहोत, असा भाव मनात असतो. अलिबाग येथील मांडवकर यांच्या श्रीकृष्ण मठात ही परंपरा शंभर वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. कृष्णा पुजारी यांच्या अंगात श्रीकृष्णाचे वारे संचारल्यावर त्यांनी दिलेले आशिर्वाद खरे ठरत असल्याचे गावचे जुन्या जाणकारांनी सांगतात.
हा उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गोविंदांसह सर्वजण भक्तिभावाने घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा करतात, आणि मग गोविंदा स्वतःच्या अंगावर आसूडाचे फटके मारून घेतो. काही गावांमध्ये हा सोहळा कृष्णजन्माच्या रात्री १२ वाजता दहीहंडी फोडल्यानंतर होतो, तर काही ठिकाणी गोपाळकाल्याच्या दिवशी दुपारी १२ वाजता साजरा केला जातो. या प्रथेत गोविंदाच्या डोक्यावर दहीहंडी फोडण्याचीही परंपरा आहे.
कोकणातील ही शतकभर जुनी श्रद्धा आणि भक्तीची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जपली जाते, हेच या सणाचे वैशिष्ट्य आहे.