

श्रीवर्धन : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच जिल्ह्यात युती झाली तर ठीक; पण जर नाही झाली, तर आपण स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा! सत्ता कोणाच्या हातात आहे हे महत्त्वाचं नाही, जनतेच्या मनात कोण आहे हेच आमचं बळ असल्याचा सुचक इशारा रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सोमवारी दिला.
ना. गोगावले यांच्या श्रीवर्धन दौऱ्याने तालुक्याच्या राजकीय वातावरणात चैतन्याची नवी लाट उसळली आहे. विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यांसह पदाधिकारी बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत हाक दिली. त्यांच्या हस्ते श्रीवर्धन दांडा तरिबंदर समुद्रकिनारी सेल्फी पॉईंट व सुषोभीकरण प्रकल्प, तसेच जीवनेश्वर कोंड येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी श्रीवर्धनकरांना आश्वासन दिले कोकणातील प्रत्येक किनाऱ्यावर पर्यटन व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार आहोत. आमचं ध्येय फक्त राजकारण नाही, तर विकासकारण असल्याचे नमूद केले.
या दौऱ्यात झालेल्या पदाधिकारी बैठकीत प्रभाग रचना, उमेदवारी निवड, स्थानिक प्रश्नांवरील लढाई यावर सविस्तर चर्चा झाली. ना. गोगावले यांनी सर्वांना एकत्र येऊन पक्षशक्ती वाढवण्याचे आवाहन केले. बैठकीत जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, तालुकाप्रमुख , उपतालुकाप्रमुख ओमकार शेलार, शहर प्रमुख सावन तवसाळकर, शहर संपर्क प्रमुख राजेश चव्हाण, माजी शहर प्रमुख देवेंद्र भुसाणे, महिला शहर प्रमुख सुप्रिया करदेकर, युवा सेना शहर प्रमुख अजय चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्याने श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. युती होईल की स्वबळावर लढाई, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. जनतेने विश्वास ठेवला आहे तो आमच्या कामावर. विकासाच्या बळावर आम्ही कोणासमोर झुकणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आगामी निवडणुकांची दिशा स्पष्ट केली.स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने संपूर्ण श्रीवर्धन शहर जल्लोषमय झाले. गोगावले यांच्या स्पष्टवक्तेपणाने आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ सत्तेसाठी युती नको
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका लक्षात घेऊन झालेल्या बैठकीत ना. गोगावले यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना स्पष्ट इशारा दिला काहीजण फक्त सत्ता मिळवण्यासाठी युती करतात, पण आम्ही जनतेच्या मनाशी युती केली आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही तडजोड करणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, कार्यकर्त्यांमधील गटबाजी संपवून एकसंघ राहणे हाच विजयाचा मार्ग आहे. कोकणातील प्रत्येक कार्यकर्त्याने आता सज्ज होण्याची वेळ आली असल्याचे नमूद केले.