

अलिबाग : अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आणि अस्थिर हवामानामुळे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असून, याचा फटका मुंबई–मांडवा जलवाहतूक सेवेला बसला आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान धावणारी जलवाहतूक सेवा काल (शनिवार) संध्याकाळपासून तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने घेतला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर अलिबाग, रेवदंडा, मुरूड, काशीम आणि उरण परिसरातील सर्व किनाऱ्यांवर लाल बावटे लावण्यात आले आहेत. समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता काही दिवस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. हवामान स्थिर झाल्यानंतरच पुन्हा जलवाहतूक सुरू केली जाईल.” दरम्यान, दररोज हजारो प्रवासी या सेवेचा वापर करून मुंबई आणि रायगड दरम्यान प्रवास करत असल्याने त्यांना गैरसोय होत आहे. गेटवे-मांडवा मार्गावरील फेरी सेवा, रो-रो बोट आणि स्पीडबोट प्रवास सध्या थांबवण्यात आले आहेत.
समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस व कोस्टगार्ड विभागाने गस्त वाढवली आहे. पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यापासून परावृत्त केले जात असून, मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अलिबाग व आसपासच्या सागरी भागात मुसळधार पाऊस व तीव्र वाऱ्यांचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मांडवा, काशीम आणि रेवदंडा बंदर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.