

पनवेल शहर : युद्धजन्य परिस्थितीच्या पडसादांमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, पनवेल परिसरात सकाळपासून विविध ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. गॅस उपलब्ध न झाल्याने गृहिणींमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलेंडरही मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स, वडापाव गाड्या तसेच चहा विक्रेते यांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवले आहेत. परिणामी वडापावसह इतर खाद्यपदार्थांच्या किंमती वाढू लागल्या आहेत.
गॅसचा पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या शेगड्यांची मागणी वाढली असून, त्यांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे अनेक लघु व्यावसायिकांनी पुन्हा कोळशाकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
जुन्या पनवेल, पुणे-पळस्पे फाटा येथील कोळसा गोदामांमध्ये सध्या मोठी गर्दी होत असून, कोळशाच्या विक्रीत वाढ झाली आहे.
लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
या सर्व परिस्थितीमुळे चाकरमानी व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून, येत्या काही दिवसांत कोळशाचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.