

‘स्वर्गापेक्षा सुंदर आसा, आमचो ह्यो कोकण!
तुम्ही येऊन बघा, आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन!!
असो आमचो ह्यो कोकण’...
अलिबाग (रायगड) : ऋषिता तावडे
रम्य कोकणात गणेशोत्सव तेवढाच रम्य आणि भक्तिमय असतो. हाता-तोंडाशी गाठ बांधताना मुंबईचो चाकरमानी कंपणीत नाहितर गिरणीत दोन- दोन शिफ्ट करून हाताशी थोडो अधिकचो पैसे घेऊ न, कोकणात दाखल होता आणि प्रसंगी ऋण काढून का असेना पण सण साजरो करता. दोन नवीन पँटी आणि दोन नवीन शर्टा घेऊ न गावच्या लोकांना रुबाब दाखवता, अशी त्याची खासियत आहे.
कोकणच्या दशावतारात जसो राजा भरजरी वस्त्रे घालून नाटकाचो फड गाजवता आणि सकाळी पहिल्या एसटीतून डोक्यावर बोजा घेऊ न घराक जाता, तसो आमचो चाकरमानी. येताना रुबाबात येता आणि जाताना गाडीच्या तिकटासाठी आवशीकडून पैसे घेऊ न मुंबयक जाता. पण गौरी-गणपती सात दिवसाचा सण भरल्या घरात आणि लायटीच्या झगमगाटात साजरा करतो. तसेच या निमित्ताने गावचा मुर्तिकार सुपा आणि सुपल्या बनवणारा कारागिर यांना चार पैशाची मदत हा सण करतो. कारण गौरी पुजनाला लागणारी सुप बनवणारे कारागिर तग धरून आहेत. त्यामुळे गावाला गावपण आहे. हौशी भजनीबुवा आपली गायनाची किमया घराघरात जावून दाखवतात आणि त्यांच्याही छंदाला बळ मिळतो.
शेतीत राबणारा, शिक्षणाची ओढ असलेला, बुद्धीने हुशार असलेला कोकणी माणूस गणपती उत्सवात कोणतीही कसर मागे ठेवत नाही. यानिमित्ताने आरत्या, भजने सुरु होतात. गावाच्या विकासाच्या बैठका होतात, गावच्या रस्त्याचा प्रश्न, वाडीच्या विहिरीचा प्रश्न यावरही ‘विघ्नहर्ता गणेश’ मार्ग दाखवतो. तर सण नुसता साजरा होत नाही तर लोकांची मने जोडण्याचे कामही या सणातून होते.
कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहर्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. कोकणी माणूस वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघतो आणि बाप्पाच्या आगमनासाठी गावी परत येतो. गणेशोत्सव कोकणी माणसांसाठी एक महत्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. कोकणी माणूस जगात कुठेही असला तरी, गणेशोत्सवासाठी तो आपल्या गावी परत येतो. वर्षभर तो या दिवसाची वाट पाहत असतो. एकंदरीत, गणेशोत्सव कोकणी माणसाच्या जीवनात एक महत्वाचा आणि उत्साहाचा सण आहे, जो त्याला त्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि कुटुंबाशी जोडतो. कोकणातली गणेश चतुर्थी हा आबालवृद्धांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. हा उत्सव ही सांगण्या-ऐकण्याची नव्हे, तर अनुभवण्याची गोष्ट आहे. कोकण रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या गाड्या अव्याहत धावत असल्या तरी काहीवेळा दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. असा सगळा व्याप झाला तरी त्याचा उत्साह काही कमी झालेला नसतो.
कोकणी माणूस आणि गणेशोेत्सवाचे गेल्या अनेक वर्षांपासून अतूट नाते आहे भाद्रपद महिना जवळ आला की आमच्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणी माणसाला गावाची ओढ लागते वर्षात इतर होळी दिवाळी हे सण कदाचित कोकणी माणूस यायचं टाळू शकतो पण गणपतीला रजा नाही मिळाली तर नोकरीवर कायमचे पाणी सोडून सुद्धा कोकणी माणूस येईल ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण अशी काही उदाहरणे पण कानावर येतात आणि एखाद्याला जाणे अशक्य असेल तर काही ठराविक रक्कम चाकरमानी माणूस आपल्या गावाकडील बंधू भावांना बाप्पासाठी पाठवून देणार मग भावंडात किती हाड वैर असेल तरी गणपती मूळ घरातच मोठ्या भक्तीभावाने आणला जातो. या काळात मतभेद भांडणे सर्व बाजूला राहते ही बाप्पाची किमया म्हणावी लागेल.
आता इतर शहरात सुद्धा कोकणी माणूस जाऊन कामानिमित्त स्थायिक झाला असेल पण त्याचे प्रमाण फार कमी आहे, तो चाकरमानी पण गावाकडे वळतो. पण मुंबईतून कोकणात येणारा ओघ म्हणजे प्रचंड आज जवळपास 200 च्या घरात कोकण रेल्वेच्या जादा फेर्या सोडल्या जातात. त्याही फुल्ल त्यात गणपतीच्या एक दोन दिवस अगोदरचे कन्फर्म आरक्षण ज्यांच्याकडे असेल त्यांना जणू संपूर्ण जग जिकल्यासारखे वाटत असेल, एवढे कन्फर्म आरक्षण मिळवणे अवघड असते कारण तीन महिने अगोदर आरक्षण सुरू झाल्यावर गणपतीच्या काळातले आरक्षण काही सेकंदात फुल्ल होते. या काळात सहज जर वेटिंग लिस्ट वर नजर टाकली तर हा आकडा सहज 500 ते 800 पर्यंत असतो. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लाडकी गाडी ‘कोकणकन्या’ हिची वेटिंग लिस्ट तर आणखी पुढे असते. आरक्षण नाही मिळाले तरी आमच्या कोकणी माणसाची काही तक्रार नाही. एवढ्या गर्दीत सुद्धा आमचा कोकणी माणूस गणपतीचे नाव घेऊन आपल्या लहान मुले कुटुंबासोबत प्रवास करतो. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे प्रचंड वाहनांनी फुललेला असतो एरव्ही साडेतीनशे किलोमीटर अंतर कापायला मुंबईपासून सात ते आठ तास लागतात. त्याच प्रवासाला गणपतीच्या आदल्या दिवशीबरोबर 15 ते 20 तास लागतात. याच काळात खासगी गाड्यांचे तिकीट दर दुप्पट होतात. सरकारी एसटी महामंडळ पण हजारो फेर्या सोडते, पण त्याही कमीच पडतात.
वर्षभर गावातील कायम बंद असणारे घर या आठ दहा दिवसांत उघडे दिसेल. त्या घरची झाडलोट करून त्या घरात गणेश मूर्ती स्थापन केलेली दिसते हे त्याचे बाप्पावरचे खरे प्रेम असते. कोकणात आदल्या दिवशी हिरव्यागार भात शेतीमधून चालत बाप्पाचे आगमन होते. काळानुरूप थोडा बदल होऊन आता सर्वत्र रस्ते झाल्यामुळें बाप्पा येताना आता टेम्पो किंवा छोट्या वाहनातून येऊ लागले आहेत. या काळात कोकणातील घराघरात उत्साह, आनंदाचे वातावरण असते. बापाच्या समोर भजन सेवेतून हरिनामाचा गजर केला जात असते. सर्वजण उत्साहाने, भक्तिभावाने त्या भजन, आरती करण्यासाठी मोठ्या आनंदाने सहभागी होतात. गणेश चतुर्थी कालावधीत रात्री जागवत बाप्पांचे भजने, आरत्या सादर करत गणपती बाप्पा समोर आशीर्वाद मागितले जातात. भजन हरीनाम सादर करताना वारकरी, संगीत असे सादरीकरण रुपक, गजर, अभंग, भारुड, गौळण या स्वरूपात बुवा करतात. हे करताना गणेश भक्तांचे मनोरंजन केले जाते. भजनातून बाप्पाच्या चरणी लीन होत भक्त रात्र भर जागर करतात. गावागावात भजनी बुवा हरिनाम सादर करतात. भजन ही सांघिक कला असून त्यामध्ये गायक, वादकांसोबत कोरस या सर्वांचे महत्त्व आहे. या भजनात नामावली, रुपावली, अभंग, गौळण, भारुड असे बुवा सादरीकरण करतात. नामावली म्हणजे नामाचे महत्त्व सांगणारा अभंग, रूपावली म्हणजे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारा अभंग, त्यातही अभंगाचे भक्ती स्वरुपात विविध भजने बुवा सादर करत आहेत. या भजन सादर करताना हार्मोनियम (पेटी), पखवाज, तबला, मृदंग, टाळ, झांज हे वाद्य संगीत व वारकरी भजन संस्कृती जपताना टाळ, नाल या पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. भजन आरत्यांचे सूर रोज सायंकाळी 6 वाजल्यापासून गावागावातून कानी पडतात. कुठे सत्यनारायनाची पूजा, तर कुठे शक्ती आणि तुरा यांचा जंगी सामना असे घराघरात सुरू असते. घराघरात भजन, आरती, डबलबारी भजन, फुगडी अशा विविध अंगाने पारंपारिक लोककला सादर केल्या जातात. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भजन, आरती, फुगड्यांचे सूर ऐकायला मिळतात. तसेच उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा सुगंध घराघरांतून येत असतो. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पूजले जाते. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणार्या मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. अनेक रूढी आणि परंपरा यांचे पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही.
हे... बा... गणपती महाराजा, श्रीगणेशा, हे बाप्पा मोरया तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्हाणा घालतव, तां ऐकून घे महाराज्या...... होय महाराज्या
हे देवा, तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होव दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा हा ता मान्य कर महाराजा.....-. होय म्हाराज्या
हे गणपती महाराजा, आज सगळी पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान सगळे गावाक तुझी सेवा करूक इले हत त्यांची तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा आसात ता दूर कर रे
महाराजा..... होय महाराजा
कोणाक पोर होत नसतीत तर त्यांका पोर होऊ दे, काम धंद्यात सगळ्यांका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाची लग्न जुळत नसतीत तर ती तुझ्या कृपेन जमानदेत रे महाराजा.... होय महाराजा...
हे गणपती महाराजा, लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत, तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे, तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे...... होय महाराज्या
देवा बा गणपती महाराजा, आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्यास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो, किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्यांका, माफ कर रे..... होय महाराज्या
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी रे महाराजा...... होय रे महाराज्या
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
गणा धाव रे, मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे...
कोकणात गरीब असो वा श्रीमंत मात्र गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. कारण कोकणातील माणसंही श्रद्धेची पाईक असता. त्यामुळेच कोकणी गणेशोत्सवाला आगळावेगळा परंपरेने नटलेला महोत्सव म्हणतात. या गणेशोत्सव काळात आनंद, उत्साह, भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. वाड्यावर त्याचबरोबर वस्त्यांवर भजन आरतीचा गजर होताना ऐकायला मिळत असतो. प्रत्येकाच्या घरातून स्पीकरद्वारे विविध गणपतीची भजने, बुवांच्या डबलबारी भजनांचे सादरीकरण होत असल्याने एक प्रकारे जल्लोषी, उत्साही वातावरण प्रत्येक घराघरात निर्माण झालेले असतेे. अशात अकरावा दिवस येतो आणि बाप्पा आपल्या गावी जायला निघतात. जड अंतःकरणाने कोकणातील मूळ तसे घरात आलेला चाकरमानी पण बाप्पाना निरोप देतो आणि चाकरमानी दुसर्या दिवशी मुंबईत जायला निघतो, अशात कधी कधी आमचा चाकरमानी सर्व रक्कम खर्च करून बसतो. त्यामुळे पुन्हा मुंबईत जाताना त्याला मूळ कोकणात वास्तव्यास असलेल्या आपल्या बंधू भावाकडून प्रवासाचे पैसे घेऊन सुद्धा प्रवास करण्याची वेळ येते. खरोखरच आपण या पवित्र कोकण भूमीत जन्मलो याचा अभिमान वाटतो.