

श्रीवर्धन : 'शक्ती' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण किनाऱ्यावर निसगनि पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये अशा सूचना केल्या होत्या, त्यामुळे गेल्या दोन दिवसांत रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आसऱ्याला एक हजाराहून मच्छीमार बोटी थांबल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मच्छीमारी थंडावली आहे.
सलग वादळे, वादळी वारे आणि समुद्राच्या अनिश्चित स्वभावाने रायगडातील मच्छिमार बांधवांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. समुद्र अजूनही प्रचंड धोकादायक बनला असून, मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमारांचा यंदाचा हंगाम जणू उद्धस्त झाल्याचे चित्र स्पष्ट दिसते.
दरवर्षी शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी लागू केली असते. मात्र यावर्षी पावसाचा आणि वाऱ्यांचा कहर १५ मेपासूनच सुरू झाल्याने अनेक मच्छिमारांनी आपल्या बोटी आधीच किनाऱ्यावर ओढल्या. १ ऑगस्ट रोजी मासेमारी हंगामाला सुरुवात झाली तेव्हाच पुन्हा निसगनि कोप दाखवला.
केवळ दोन महिन्यांच्या अवधीतच चार ते पाच वादळांनी कोकण किनाऱ्याला तडाखा दिला असून, आता पुन्हा शक्ती या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या सलग संकटामुळे भरटखोल, मेंदडी, दिघी, श्रीवर्धन, बागमंडला, जीवना बंदर, दांडा कोळिवाडा, मुळगाव, वाशी, कुडगाव, आदगाव, शेखाडी, आगरदांडा, दिवेआगर सह मुरुड,अलिबाग आणि उरणच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
समुद्रात गेलं की जीव धोक्यात असतो. वादळ कधी येईल सांगता येत नाही. दोन दिवस समुद्रात गेलो, पण मासे नाहीत. वादळ थांबत नाही आणि मासे मिळत नाहीत असे मच्छीमार सांगतात. ही दुहेरी झळ प्रत्येक किनारी गावाला बसली आहे. शासनाने तातडीने सानुग्रह आर्थिक पॅकेज जाहीर करून, डिझेल सवलत लागू करावी,जाळी व बोटी दुरुस्तीसाठी अनुदान मिळावे, तसेच कर्जसवलतीसह आपत्ती निवारक निधीतून थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मच्छिमारांची मागणी आहे. या गंभीर परिस्थितीकडे रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली आहे.
मांडवा ते गेट वे लॉन्च सेवाही बंद
चक्रीवादळामुळे मच्छीमारी बोटी ज्या प्रकारे फटका बसला आहे, त्याबरोबर कोकणच्या किनाऱ्यावरील प्रवासी जलवाहतुकही प्रभावीत झाली आहे. तीव्र वादळाच्या शक्यतेमुळे मांडवा ते गेट वे ही लॉन्च वाहतूक सेवा रविवारी बंद होती. चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असली तरी हवामानाचा अंदाज घेऊन जलप्रवासी वाहतूक सेवा सुरु ठेवली जाणार असल्याचे सांगितले जाते.
रायगडातील किनारी मच्छिमार बांधवांचा सध्या गंभीर आर्थिक आणि जीवनावश्यक संकट आहे. सलग वादळांनी मासेमारी ठप्प झाली. घरातील भूक आणि कर्जाचे ओझे वाढले आहे. आम्ही खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आपली व्यथा पोहोचवण्याची अपेक्षा करतो. त्यांनी या समस्येकडे गांभीयनि लक्ष द्यावे आणि शासनामार्गे तातडीने सानुग्रह आर्थिक पॅकेज, डिझेल सवलत, बोटी व जाळी दुरुस्तीकरिता अनुदान मिळवून द्यावे, याची आम्ही ठाम मागणी करतो. मच्छिमारांचे जीवन व उपजीविका पुन्हा सुरळीत व्हावी, अशीच आम्हाला आशा आहे.
भारत चोगले, अध्यक्ष, श्रीकृष्ण मच्छिमार संस्था, श्रीवर्धन
वादळांनी आमचं आयुष्य विस्कळीत केलं आहे. समुद्रात गेलो तरी मासे नाहीत. डिझेल, बर्फ आणि जेवणासाठी लागणारा साहित्याचा खर्च वाढला आहे. खलाशी वर्गाचे पगारही सुटत नाही. घरातील भूक आणि कर्जाचे ओझे दिवसागणिक वाढत चाललेय. आमच्या संकटाकडे शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि सानुग्रह अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.
हरिओम चोगले, मच्छीमार नेते, भरडखोल