

नवी मुंबई : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाला अतिवृष्टी, वादळी वारे यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच पारंपरिक मच्छिमारांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक असूनही खराब हवामानामुळे या दोन महिन्यांत पारंपरिक मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. यामुळे, कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यावर्षी, नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान, समुद्राची मोठी भरती आणि अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे मासेमारीत काही दिवसांचा खोळंबा झाला. त्यानंतर मासेमारी सुरू झाली. मात्र, पुन्हा गौरी-गणपतीच्या काळात खराब हवामानामुळे मासेमारी खोळंबली. वादळी हवामानामुळे बोटी समुद्रात अडकल्या. मासेमारी ठप्प झाली. नवरात्रोत्सव सुरू होताच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे मासेमारी खोळंबली. यामुळे, नवी मुंबईतील स्थानिक कोळी बांधवांना याचा फटका बसला आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक महिने असूनही खराब हवामान, वादळ आणि अतिवृष्टी यामुळे या दोन महिन्यांत पारंपरिक मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. मासेमारीकरिता खर्च जास्त आणि केलेल्या मासेमारीतून उत्पन्न कमी अशी बिकट परिस्थिती पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या दिवाळे कोळीवाड्यासह करावे, वाशी, ऐरोली, दिवा कोळीवाडा यांच्यासह नवी मुंबईतील कोळी बांधवांची झाली आहे. याशिवाय मासेमारीच्या व्यवसायाशी संबंधित अन्य घटकही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.
प्रदूषणाचाही परिणाम
तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका मासेमारांना बसला आहे. या दूषित पाण्यामुळे अनेकदा खाडीतील मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे एकविरा मच्छिमार सेवा संस्थेचे अध्यक्ष विष्णू कोळी यांनी सांगितले.