

किल्ले रायगड : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त राज दरबार ते शिवसमाधी अशी श्री शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्या ठिकाणी शिवछत्रपतींना रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. पहाटे पाच वाजता श्री जगदीश्वर मंदिरामध्ये पूजा होऊन सहा वाजता श्री हनुमान जयंती उत्सव संपन्न झाला.
शिव पुण्यतिथी सोहळ्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी रात्री सात वाजता शिवसमाधी व जगदीश्वर मंदिर मध्ये दीप वंदना, रात्री साडेआठ वाजता राज्यसभेत पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती तर साडेनऊ वाजता ही रात्र शाहिरांची या कार्यक्रमांतर्गत शाहीर सुरेश सूर्यवंशी पुणे यांनी आपली दमदार अदाकारी सादर केली. रात्री दहा वाजता श्री जगदीश्वर प्रांगणात हरी जागर झाल्यानंतर पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
किल्ले रायगडवरील आज श्री शिव पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त रोपवे परिसरातील सर्व दुकाने व हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्याबद्दल स्थानिकांमधून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात येथील एक हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते लहू अवकीरकर यांनी किल्ले रायगडावर होणारे कार्यक्रम अधिक भव्य प्रमाणात व्हावेत, ही आमची इच्छा आहे. किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांमुळेच आमच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची सोय होते. यासाठी आम्ही लाखो रुपये कर्ज काढून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय व लॉजिंग व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, अशा व्हीआयपींच्या दौऱ्यानिमित्त आम्हाला किमान तीन ते चार दिवस व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले जाते. यासंदर्भात शासनाने या धोरणाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिव पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पत्रकार, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांना देखील विशेष पास दिला होता. शासनाने दिलेल्या गाडीमधून वाय जंक्शन पर्यंत प्रवास करावा लागला. तेथून दोन किलोमीटर अंतर सर्व व्ही व्हीआयपी पास धारक पत्रकार व सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना चालत जाऊन रोपवेपर्यंत पोहोचावे लागले. याबाबत अनेक मान्यवरांनी आपली तीव्र नापसंती व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय उड्डान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवरायांच्या समाधीवर विभागाच्या वतीने प्रतिवर्षी पुष्पवृष्टी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर्षीपासून त्याची सुरुवात करण्यात आल्याबद्दल मंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना धन्यवाद देण्यात आले.