

नाते : इलियास ढोकले
चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी श्री शिव पुण्यतिथी सोहळ्याकरिता शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने किल्ले रायगडावर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी केले आहे.
या वर्षी श्री शिव पुण्यतिथी सोहळ्याचे ३४५ वे वर्षे असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, भरत गोगावले, सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ सदस्य व रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सेवांची पूर्तता करण्यात आली आहे. किल्ले रायगडावर श्री शिव पुण्यतिथी सोहळ्यासाठी येण्याकरिता १२ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत रोपवे व्यवस्था सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. गडावर येण्यासाठी शिवभक्तांना कोणताही प्रतिबंध पोलीस प्रशासन अथवा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे व छत्रपतींना मानवंदना अर्पण करावी, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.