

पोलादपूर : गतवर्षी २२ नोव्हेंबरमध्ये महामार्ग विभागा मार्फत टपरी व अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, याची टपरीधारकांनी दखल घेतली नव्हती. अखेर आज (दि.७) प्रशासनाने टपऱ्या काढून रस्ता अतिक्रमणमुक्त केला. दरम्यान, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि टपरी धारक हवालदिल झाले आहेत.
रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने व वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास येताच महामार्ग विभागातर्फे कारवाई करत सर्व टपऱ्या, दुकाने हटविण्यात आल्या. महामार्ग विभागाने पोलादपूर बस स्थानक समोरील टपरी धारक यांना नोटिसा पाठवत १५ दिवसांत टपऱ्या हलविण्यात यावेत, असे सांगितले होते. मात्र इतर ठिकाणी व्यवसाय तसेच उत्पन्न निहाय जागा नसल्याने आहे त्याच ठिकाणी आजपर्यत टपऱ्या उभ्या होत्या.
२०१७ मध्ये सुरु झालेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या कामावेळी चुकीच्या नियोजनामुळे पोलादपूर येथे अंडरपास करण्यात आला. यामुळे पोलादपूर बस स्थानका समोरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी झाली. अंडरपास व सर्व्हिस रोडमुळे टपरी धारकांना व्यवसाय करण्यासाठी जागा न उरल्याने पोलादपूर बस स्थानकासमोरील महामार्गाच्या पुलावर या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या सुरु केल्या होत्या.