

Early morning armed robbery in Gavan; 5 tolas of gold, 2 lakhs in cash looted at knifepoint
पनवेल : विक्रम बाबर : उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण गाव येथे मंगळवारी (१८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गव्हाण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाण गावातील शेवंती धाया कोळी (वय ५३) यांच्या घरी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरटे घुसले. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील व्यक्तींना धमकावले. त्यानंतर घरातील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उलवा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. याप्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चारही अनोळखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे गव्हाण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी तपास सुरू केला आहे.