

पनवेल: आरिवली गावाजवळील आरएमसी प्लान्टमध्ये फिरत्या सिमेंट मिक्सरच्या टाकीत पडून १८ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कृष्ण कला डेव्हलपर्स आरएमसी कंपनीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मनीषकुमार यादव (वय १८, रा. काकरकुंड, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मनीष हा आरिवली गावाजवळील आरएमसी प्लान्टमध्ये काम करीत होता. यावेळी तो फिरत्या सिमेंट मिक्सरच्या टाकीत पडला. या दुर्घटनेत त्याच्या पाठ, छाती तसेच हाताला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर मनीषला तातडीने उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची चौकशी सुरू केली.
दरम्यान, आरएमसी प्लान्टमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने व प्रशिक्षण देण्यात आले होते का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी कृष्ण कला डेव्हलपर्स आरएमसी कंपनीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दुर्घटनेमुळे पनवेल तालुक्यातील विविध बांधकाम प्रकल्पांवरील आरएमसी प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवजड यंत्रसामग्री आणि फिरत्या मिक्सरच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.